तटरक्षक दलाकडून अरबी समुद्रात अडकलेल्या व्यक्तीला जीवदान

समुद्रातील खराब हवामानामुळे मदत पोहचू शकली नाही
तटरक्षक दलाकडून अरबी समुद्रात अडकलेल्या व्यक्तीला जीवदान
Published on

कोची : केरळमधील कोची येथील किनाऱ्यापासून ११० सागरी मैल अंतरावर अरबी समुद्रात नादुरुस्त जालेल्या नौकेवर अडकलेल्या एका भारतीय कर्मचाऱ्याला तटरक्षक दलाच्या बचाव पथकाने जीवदान दिले आहे. एमटी ग्लोबल स्टार ही नौका संयुक्त अरब अमिरातीमधील खोरफाक्कान येथून श्रीलंकेतील कोलंबो येथे निघाली होती. वाटेत तिच्या इंजिनात बिघाड झाल्याने ती अरबी समुद्रात कोचीपासून ११० सागरी मैलांवर नांगर टाकून थांबली होती. या नौकेवरील एका भारतीय कर्मचाऱ्याला उच्च रक्तदाब आणि स्ट्रोकचा त्रास होत होता. त्याला मदत करण्यासंबंधी विनंती रविवारी इटलीतील रोम येथील बचाव केंद्रामार्फत मुंबईतील बचाव केंद्राला करण्यात आली. मुंबईतील केंद्राने कोची येथील केंद्राला ही माहिती कळवताच त्याच परिसरात गस्त घालत असलेली भारतीय तटरक्षक दलाची अर्णवेश ही नौका मदतीसाठी रवाना करण्यात आली. मात्र, समुद्रातील खराब हवामानामुळे मदत पोहचू शकली नाही. त्यानंतर सोमवारी कोची येथील तळावरून तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर नादुरुस्त झालेल्या नौकेकडे पाठवण्यात आले. हेलिकॉप्टरच्या कर्मचाऱ्यांनी खवळलेला समुद्र आणि तुफानी वाऱ्यांची पर्वा न करता आजारी कर्मचाऱ्याला वाचवले आणि पुढे त्याला एर्नाकुलम येथील रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in