

नवी दिल्ली : इतके दिवस केवळ सोशल मिडियातील एक चळवळ असलेली कॉकरोच जनता पार्टी शनिवारी अखेर प्रत्यक्षात जमिनीवर अवतरली. या चळवळीचे संस्थापक अभिजीत दीपके अमेरिकेतून सकाळी भारतात आले व त्यानंतर त्यांच्यासह हजारो तरुणांनी दिल्लीच्या जंतरमंतरवर दिवसभराचे आंदोलन केले. सरकारला सांगा, आम्ही घाबरत नाही अशी घोषणा दीपके यांनी यावेळी करताच उपस्थितांनी तिला प्रचंड दाद दिली.
देशातील विविध परीक्षांमधील पेपरफुटी आणि घोटाळे यांची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी मुख्यतः हे आंदोलन करण्यात आले. सकाळी साडेदहा वाजता सुरू झालेल्या आंदोलनाची साडेतीन वाजता सांगता करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण जंतर-मंतर परिसर रिकामा करण्यात आला. पाच तासांच्या धरणे आंदोलनानंतर राजीनाम्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली. त्या काळात मागणी पूर्ण न झाल्यास येत्या शनिवारी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा 'झुरळां' च्या या पक्षाने दिला.
दीपके यांचे अमेरिकेतून आगमन या आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दीपके शनिवारी सकाळीच अमेरिकेतून दिल्लीत दाखल झाले. दिल्ली पोलिसांची परवानगी मिळाल्यानंतर ते थेट जंतरमंतरवर पोहोचले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली होती. दिपके यांच्यासोबत प्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचूक, भाकप (माले) चे सरचिटणीस दीपंकर भट्टाचार्य, भाकपच्या अॅनी राजा आणि विविध विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
'कॉक्रोच मास्क' आणि शांततापूर्ण आंदोलन आंदोलक हातात प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे फलक घेऊन आले होते. विशेष म्हणजे, आंदोलक 'कॉक्रोच' (झुरळ) मास्क घालून सहभागी झाले होते, सभेमध्ये हे मास्क वाटले जात होते. दीपके यांनी कार्यकर्त्यांना हिंसा टाळण्याचे आणि केवळ देश, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा देण्याचे आवाहन केले होते.
सोनम वांगचूक यांची प्रशंसा
यावेळी सोनम वांगचूक यांनी तरुण पिढीच्या शांततापूर्ण आंदोलनाचे कौतुक केले. दिपके यांचा उल्लेख 'कॉक्रोच-इन-चीफ' असा करत वांगचूक म्हणाले की, "तुम्ही घरी बसून रडत राहिला नाहीत किंवा रस्त्यावर गोंधळही घातला नाही, ही मोठी गोष्ट आहे."
प्रशासनाची खबरदारी
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विमानतळ, सीमा आणि संवेदनशील भागांत १,००० हून अधिक पोलीस तैनात होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सहा जणांना ताब्यात घेतले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास अभिजीत दीपके यांची प्रकृती थोडी बिघडल्यामुळे आंदोलन थांबवण्यात आले.
हे आंदोलन नीट, सीबीएसई, सीयूईटी, आणि एसएससी परीक्षांमधील घोटाळ्यांच्या विरोधात यावेळी अनेकांनी संताप व्यक्त केला. या भानगडींचा फटका बसलेले विद्यार्थी व त्यांचे पालक या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.
'आम्ही विकले गेलेलो नाही'
संबोधनादरम्यान दीपके म्हणाले, "माझ्या आईला भीती होती की मी भारतात परतल्यावर मला अटक होईल. ही भीती फक्त माझ्या आईची नाही, तर ज्यांना राजकारणाबद्दल बोलायची इच्छा आहे, अशा प्रत्येक पालकाची आहे. सोशल मीडियावर आम्ही महिनाभरापासून आवाज उठवत आहोत, पण हे लोक आमची खाती हॅक करण्यात आणि पोस्ट हटवण्यात व्यस्त आहेत. तुम्ही आमच्या पोस्ट हटवू शकाल, पण आम्हाला या प्रक्रियेतून पुसून टाकू शकत नाही." ते पुढे म्हणाले की, देशातील युवक आणि विद्यार्थी विकले गेलेले नाहीत.
घराबाहेर बंदोबस्त वाढवला
संभाजीनगर: तिकडे दिल्लीत आंदोलन होत असताना इकडे संभाजीनगरात अभिजित दीपके यांच्या निवासस्थानी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. दीपके यांचे आई-वडील सध्या वाळूज येथील त्यांच्या घरी राहत नसल्याचेही त्यांनी सांगितले. "ते माझ्या संपर्कात नाहीत," असे सांगून त्यांनी अधिक तपशील देण्यास नकार दिला. दरम्यान, एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, पूर्वी दीपके यांच्या निवासस्थानी एक रक्षक तैनात होता, मात्र आता एक अधिकारी आणि दहा पोलिसांची टीम तैनात करण्यात आली आहे.
यांना कमी लेखू नका - उद्धव ठाकरे
ज्यांना आपण देशाचे भाग्यविधाते आणि भवितव्य म्हणतो, ते हजारो तरुण आपल्या वेदना तसेच भविष्याची चिंता घेऊन रणरणत्या उन्हात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना 'कॉकरोच' म्हणून हिणवणे आणि न्याय नाकारणे योग्य नाही. हे सर्व पीडित विद्यार्थी कॉकरोच बनून आपला आक्रोश व्यक्त करत आहेत. सरकारला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागेल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी यांनी दिला. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून या अन्यायाविरोधात तरुण-तरुणी आंदोलन करत आहेत. हे सर्व पीडित विद्यार्थी कॉक्रोच बनून आपला आक्रोश व्यक्त करत आहेत. या कॉक्रोचना कमी लेखू नका, हा इशारा जंतरमंतरवरील आंदोलनाने दिला आहे, असे सांगत ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागील भावना समजून घेण्याचे आवाहन सरकारला केले आहे.