CJP Protest : संघर्ष सुरूच राहणार; झुरळांनी व्यक्त केला निर्धार

कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन मंगळवारी पुन्हा नव्या दमाने सुरू झाले. सोमवारच्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यानंतरही आंदोलकांचे मनोधैर्य कायम असल्याचे स्पष्ट झाले.
CJP Protest : संघर्ष सुरूच राहणार; झुरळांनी व्यक्त केला निर्धार
CJP Protest : संघर्ष सुरूच राहणार; झुरळांनी व्यक्त केला निर्धार(संग्रहित छायाचित्र)
Published on

नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन मंगळवारी पुन्हा नव्या दमाने सुरू झाले. सोमवारच्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यानंतरही आंदोलकांचे मनोधैर्य कायम असल्याचे स्पष्ट झाले. सोमवारी संध्याकाळी पोलिसांनी जंतरमंतरवरील स्टेज तोडून टाकले होते. मात्र आंदोलकांनी रातोरात ते उभे केले. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह आपल्या मुख्य मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असे सीजेपी प्रमुख अभिजित दीपके यांनी माध्यमांना सांगितले.

दीपके यांच्यासह अनेक नेते काल रात्रभर जखमी आंदोलकांची विचारपूस करण्यासाठी इस्पितळात गेले होते. आज दिवसभरात आरोग्यमंत्री जेपी नड्डा, राहुल गांधी, प्रियांका गांधी व इतरांनीही इस्पितळाला भेट दिली व जखमींची चौकशी केली. नड्डा यांनी इस्पितळाच्या डॉक्टरांकडून उपचारांबाबत माहिती घेतली.

मंगळवारी दिवसभरात या घटनेचे पडसाद संसदेत उमटले. संध्याकाळी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोककल्याण मार्गावरील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले.

न्यायालयाला यात ओढू नका

दरम्यान सोमवारी दिल्ली पोलिसांनी केलेल्या "अतिबळाच्या वापरा"विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट नकार दिला. मुख्य न्यायाधीश डी. के. उपाध्याय आणि न्या. तेजस कारिया यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला ठणकावून सांगितले की, न्यायालयाला या सगळ्यात ओढू नका. या प्रकरणाची सुनावणी बुधवारी नियमित प्रक्रियेनुसार घेतली जाणार आहे.

पवारांची भेट

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभिजीत दीपके यांची भेट घेतली आणि आंदोलनादरम्यान जखमी झालेल्यांची विचारपूस केली, तसेच त्यांच्या मागण्या सविस्तर जाणून घेतल्या. सरकार आणि प्रशासन जनतेला उत्तरदायी आहे, असे पवार यांनी यावेळी बजावले.

‘जनरल कायर’चा लाठीमार- राऊत

मुंबई : ‘ दिल्लीमध्ये सोमवारी जो प्रकार झाला त्यानंतर मला जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण झाली. तिथे जनरल डायरने गोळ्या घातल्या इथे भाजपच्या ‘जनरल कायर’ने तरुणांवर लाठीचार्ज केला, अश्रूधूर सोडला, यामध्ये लहान लहान मुलींचा आक्रोश पाहिला. यांना मुलंबाळं नसल्याने आणि जी आहेत ती परदेशात सुरक्षित असल्याने त्यांना आमच्या भारतामधील मुलांचे आणि त्यांच्या आई-वडीलांचे दु:ख कळणार नाही.

कालचा दिवस हा लोकशाहीमधील काळा दिवस होता. यापुढे २० जुलै हा ‘डरपोक दिवस’ म्हणून साजरा केला पाहिजे’, अशी बोचरी टीका ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री उशिरा जंतर-मंतरवर आंदोलकांची भेट घेतली.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in