नवी दिल्ली : माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नोकरकपात वेगाने सुरू आहे. २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांनी ४० टक्के अधिक नोकरकपात केली आहे. २,२६,००० कर्मचाऱ्यांना या कंपन्यांनी घरी बसवले आहे.
अल्टइंडेक्स डॉटकॉमने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील परिस्थिती अधिक गंभीर आहे. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात या कंपन्यांमध्ये नोकरकपात सुरू आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२२ मध्ये कंपन्यांनी १६४,७४४ कर्मचाऱ्यांना घरी बसवले होते. यंदा जानेवारीत ७५,९१२, फेब्रुवारीत ४० हजार नोकरकपात केली.
जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता, महागाई, पुरवठा साखळीतील अडथळे, महसुलात होणारी घट यामुळे माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांनी २०२३ मध्ये मोठी नोकरकपात केली. यात गुगल, मेटा, मायक्रोसॉफ्ट व ॲॅमेझॉनचा समावेश आहे. या बड्या कंपन्यांसोबत माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील शेकडो कंपन्यांनी खर्च कपात केली. त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना घरी बसवले आहे. २०२१ च्या प्रारंभीपासून आतापर्यंत ४ लाख ५ हजार जणांना रोजगार गमवावा लागला आहे. अमेरिकेतील बड्या माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांनी मोठी नोकरकपात केली. या कंपन्यांनी १० पैकी ८ कर्मचाऱ्यांना घरी बसवले आहे.