कोइंबतूर विमानतळाजवळ गँगरेप प्रकरण; पोलिसांवर हल्ला करून पळण्याचा प्रयत्न करणारे तिघे अटकेत

Coimbatore News : कोइंबतूर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ २० वर्षांच्या कॉलेज विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना सोमवारी रात्री उशीरा थुडियालूरजवळील वेल्लकिनार परिसरातून अटक केली. शोध मोहिमेदरम्यान पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी तिघांच्या पायावर गोळी झाडली.
कोइंबतूर विमानतळाजवळ गँगरेप प्रकरण; पोलिसांवर हल्ला करून पळण्याचा प्रयत्न करणारे तिघे अटकेत
Published on

कोइंबतूर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ २० वर्षांच्या कॉलेज विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना सोमवारी रात्री उशीरा थुडियालूरजवळील वेल्लकिनार परिसरातून अटक केली आहे. शोध मोहिमेदरम्यान पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी तिघांच्या पायावर गोळी झाडली. त्यानंतर तिन्ही आरोपींना कोइंबतूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (CMCH) मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून एका जखमी पोलिस हवालदारालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अटक केलेल्या आरोपींची ओळख गुना ऊर्फ थवासी, सतीश ऊर्फ करुप्पासामी (वय ३०) आणि कार्तिक ऊर्फ कालीश्वरन (दोघेही सुमारे २० वर्षांचे) अशी झाली असून तिघेही शिवगंगई जिल्ह्यातील रहिवासी आहेत. तिघेही रोजंदारीवर काम करणारे कामगार आहेत आणि त्यांचा पूर्वीचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास एका विशेष पोलिस पथकाने संशयितांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी पोलिस कॉन्स्टेबल चंद्रशेखर यांच्या मनगटावर चाकूने हल्ला केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. स्वसंरक्षणासाठी आणि आरोपींना पळून जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या पायावर गोळी झाडली. करुप्पासामी आणि कलीश्वरन यांच्या दोन्ही पायांवर गोळ्या झाडण्यात आल्या, तर थवासीच्या एका पायावर गोळी लागली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

काय आहे घटना?

एका खासगी कॉलेजमधील प्रथम वर्षाची पदव्युत्तर विद्यार्थिनी तिच्या प्रियकरासह रविवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास कारमध्ये बोलत होती. एअरपोर्टजवळ, वृंदावन नगर-एसआयएचएस कॉलनी रोडलगत त्यांची कार उभी होती. त्याचवेळी दुचाकीवर आलेल्या तीन जणांच्या टोळक्याने त्यांना बघितले. त्यांनी कारची काच फोडली, दरवाजा उघडला आणि तिच्या प्रियकरावर हल्ला करून तिला बळजबरी निर्जन ठिकाणी घेऊन गेले आणि अत्याचार केला. पीडित तरुणी मूळ मदुराईची रहिवासी असून कोयंबतूर येथे शिक्षणासाठी आली असल्याचे समजते. थोड्यावेळाने शुद्धीवर आलेल्या तिच्या जखमी प्रियकराने पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहिम राबवली असता सकाळी सुमारे ४ वाजता विमानतळापासून एका किलोमीटर अंतरावर असलेल्या खासगी कॉलेजच्या मागील निर्जन भागात पोलिसांना ती मुलगी सापडली. तिला तत्काळ सीत्रा परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, सोमवारी सकाळी फॉरेन्सिकचे पथक पुरावे गोळा करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी सात विशेष पथकांची स्थापना करण्यात आली होती.

logo
marathi.freepressjournal.in