बोगोटा : भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीबाबत कोलंबियाने सहानुभूती व्यक्त केली होती, मात्र त्यावर काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी आक्षेप घेतल्यानंतर कोलंबिया सरकारने आपला शोकसंदेश मागे घेतला आहे. जागतिक स्तरावर दहशतवादाविरुद्ध भारताच्या कडक भूमिकेला आणि पाकिस्तानला उघड करण्याच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.
काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळाने कोलंबियामध्ये पाकिस्तानचा पर्दाफाश केला. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीबद्दल कोलंबियाने सहानुभूती व्यक्त केली होती. परंतु थरूर यांनी आक्षेप घेतल्यानंतर कोलंबिया सरकारने दिलेला शोकसंदेश मागे घेतला आहे.
बहुपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे शशी थरूर यांनी कोलंबियामध्ये माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले, कोलंबिया सरकारने पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींबद्दल सहानुभूती व्यक्त करायला हवी होती, मात्र पाकिस्तानमध्ये झालेल्या नुकसानाबद्दल शोक व्यक्त केला याबद्दल भारत नाराज झाला आहे. दहशतवाद पसरवणारे आणि त्यांच्याशी लढणारे यांच्यात समानता असू शकत नाही. आम्ही फक्त स्वसंरक्षणाचा अधिकार वापरत आहोत. जर या मुद्द्यावर काही गैरसमज असेल तर तो दूर करण्यासाठी आम्ही येथे आहोत, असे थरूर यांनी सांगितले.
कोलंबियाने विधान घेतले मागे
भारतीय शिष्टमंडळाने कोलंबियाच्या उपपरराष्ट्र मंत्री रोझा योलांडा विलाविचेंसिओ यांना भारताच्या भूमिकेबद्दल सांगितले. यानंतर कोलंबियाने पाकिस्तानच्या समर्थनार्थ केलेले विधान मागे घेतले. कोलंबियाने भारताची भूमिका समजून घेण्याच्या कोलंबियाच्या भूमिकेचे कौतुक करताना थरूर म्हणाले की, उपपरराष्ट्र मंत्र्यांनी अतिशय विनम्रपणे सांगितले, की त्यांनी विधान मागे घेतले आहे. आता त्यांना आमची भूमिका पूर्णपणे समजली आहे.
थरूर यांनी दिली माहिती
थरूर यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, आजची सुरुवात उपपरराष्ट्र मंत्री रोझा योलांडा व्हिलाविचेंसियो आणि आशिया-पॅसिफिक प्रकरणांसाठीच्या त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांसोबतच्या एका उत्तम बैठकीने झाली. मी भारताचा दृष्टिकोन स्पष्ट केला आणि ८ मे रोजी पाकिस्तानबद्दल संवेदना व्यक्त करणाऱ्या विधानावर निराशा व्यक्त केली. मंत्र्यांनी आश्वासन दिले, की हे विधान मागे घेण्यात आले आहे आणि भारताची भूमिका आता चांगल्या प्रकारे समजली आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे.