
जबलपूर : कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरोधात अपमानास्पद वक्तव्य करणारे मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांच्याविरोधात पोलिसांनी दाखल केलेल्या ‘एफआयआर’च्या भाषेवरून हायकोर्ट गुरुवारी संतप्त झाले. याप्रकरणी तपशीलवार ‘एफआयआर’ लिहा, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले.
न्या. अतुल श्रीधरन व न्या. अनुराधा शुक्ला यांनी सांगितले की, पोलिसांनी लिहिलेल्या ‘एफआयआर’ला आव्हान दिल्यास तो तत्काळ रद्द करता येऊ शकेल, अशी त्यातील भाषा आहे. या ‘एफआयआर’मध्ये तपशीलवार गुन्ह्याचे स्वरूप लिहा. तसेच या प्रकरणाचा तपास नि:पक्षपातीपणे करावा, असे न्यायालयाने पोलिसांना बजावले.
मंत्री असून कोणती भाषा वापरता - सुप्रीम कोर्ट
मध्य प्रदेश हायकोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर या विरोधात मंत्री विजय शहा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली असता ‘तुम्ही मंत्री असून कोणती भाषा वापरता? हे तुम्हाला शोभते का?’, अशा शब्दांत सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी शहा यांना फटकारले. याप्रकरणी शुक्रवारी सुनावणी केली जाणार असून, सरन्यायाधीशांनी हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला.