तवांगजवळ चिनी सैन्याच्या संयुक्त तुकड्या तैनात

चीनकडून गेल्या काही वर्षांत सीमेवरील घुसखोरीच्या घटनांत वाढ झाली आहे
तवांगजवळ चिनी सैन्याच्या संयुक्त तुकड्या तैनात

नवी दिल्ली : गतवर्षी अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरील यांगत्से भागात भारतीय लष्कराने चिनी सैन्याला पिटाळून लावल्यानंतर चीनने या भागात सैन्याच्या संयुक्त तुकड्या (कम्बाइन्ड आर्म्स ब्रिगेड) तैनात केल्या आहेत. विविध कृत्रिम उपग्रहांनी घेतलेल्या छायाचित्रांवरून ही बाब स्पष्ट झाली आहे.

चीनकडून गेल्या काही वर्षांत सीमेवरील घुसखोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. चीनने २०१७ साली भूतान, भारत आणि चीनच्या सीमा मिळतात तेथे डोकलाम पठारावर घुसखोरी केली होती. तेव्हा भारताने त्याला अनेक दिवस प्रतिकार केला होता. त्यानंतर २०२० साली चीनने लडाख प्रदेशात घुसखोरी करून गलवान येथे भारतीय जवानांची हत्या केली. त्यानंतर गतवर्षी चीनने अरुणाचल प्रदेशातील तवांगजवळच्या यांगत्से या ठिकाणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. पण, भारतीय लष्कराने तो प्रयत्न हाणून पाडला होता.

यांगत्से येथील घुसखोरीवेळी चिनी लष्कराची संयुक्त तुकडी तेथून जवळच त्सोना झोंग परिसरातील लामपुग येथे तैनात होती. मात्र, आता ती तुकडी चीनने ल्होनत्से झोंग परिसरातील रिटांग येथे हलवली असल्याचे उपग्रहांच्या छायाचित्रांवरून दिसत आहे. भारतानेही याला उत्तर देण्यासाठी पुरेशी तयारी केली आहे. तेथील डोंगररांगावर भारताने किमान अर्धा डझन ठाण्यांवर आपले सैनिक सज्ज ठेवले आहेत. या विभागात भारतीय सैन्य चीनपेक्षा अधिक मोक्याच्या ठिकाणी तैनात आहे. मंगळवारी दसऱ्यानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी तवांग येथे जवानांसोबत शस्त्रपूजन करून विजयादशमी साजरी केली. तसेच त्यांनी सीमेवरील लष्करी तयारीची पाहणीही केली.

logo
marathi.freepressjournal.in