

नवी दिल्ली : हॉटेल आणि रेस्टॉरंट्समध्ये वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक (कमर्शियल) एलपीजी सिलिंडरच्या दरात सोमवारपासून ४२ रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर पाच किलोच्या छोट्या सिलिंडरच्या किमती पाच रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. मात्र, सर्वसामान्य जनतेच्या स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या पाच महिन्यांमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमती दुप्पट झाल्या आहेत.
उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दरवाढीनंतर दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत ३,०७१.५० रुपयांवरून वाढून आता ३,११३.५० रुपये झाली आहे. वेगवेगळ्या राज्यातील वाढ वेगळी असून सिलिंडरचे दर ४२ ते ५३.५० रुपयांपर्यंत वाढणार आहेत. आहेत. छोटे व्यावसायिक आणि नागरिकांद्वारे वापरल्या जाणाऱ्या पाच किलोच्या सिलिंडरचा दर ८२१.५० रुपये झाला आहे. आज या सिलिंडरच्या दरात ११ रुपयांची वाढ झाली आहे.
दुसरीकडे, घरगुती स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलोच्या सिलिंडरचे दर ९१३ रुपयांवर स्थिर आहेत. त्यामुळे गृहिणींना तूर्तास दिलासा मिळाला आहे. गॅस कंपन्यांनी अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत दुसऱ्यांदा १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत सुधारणा केली आहे. यापूर्वी, १ मे रोजी नवीन किमती लागू करण्यात आल्या आहेत. त्यावेळी, कंपन्यांनी सिलिंडरच्या किमती वाढविल्या होत्या.
घरगुती वापराच्या १४ किलोच्या सिलिंडरच्या दरात ७ मार्चला बदल करण्यात आला होता. त्यानंतर त्यामध्ये बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरचा दर ९१३ रुपये, कोलकाता येथे ९३९ रुपये आणि मुंबईत ९१२.५० रुपये इतका आहे.
सातव्यांदा दरवाढ
चालू वर्षात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती सातत्याने वाढत आहे. जानेवारीत १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १६९१.५० रुपये इतकी होती. फेब्रुवारीमध्ये किमतीत ४९ रुपयांची, मार्चमध्ये ११५ रुपयांची, तर एप्रिलमध्ये यात आणखी १९५.५० रुपयांची वाढ झाली.
गेल्या महिन्यात मेमध्ये कंपन्यांनी एकाच वेळी किमतीत सुमारे ९९३ रुपयांची प्रचंड वाढ केली. मध्यपूर्वेत इराणविरोधात अमेरिका आणि इस्रायलचे युद्ध सुरू असल्याने त्याचा देशातील इंधनाच्या दरावर परिणाम झाला आहे. डिझेल-पेट्रोलच्या दरवाढीमुळे महागाईत भर पडली आहे.