ज्ञानवापीच्या तळघराचे वैज्ञानिक सर्वेक्षण करा; हिंदू पक्षाची सुप्रीम कोर्टात याचिका

ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात शिवलिंग असल्याचा दावा हिंदूंच्या वतीने करण्यात आला होता. त्यावर सुप्रीम कोर्टाने हा परिसर प्रतिबंधित करण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत.
ज्ञानवापीच्या तळघराचे वैज्ञानिक सर्वेक्षण करा; हिंदू पक्षाची सुप्रीम कोर्टात याचिका

नवी दिल्ली : वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीचे तळघर खुले करून प्रतिबंधित भागाचे वैज्ञानिक सर्वेक्षण करावे, अशी मागणी करणारी याचिका हिंदू पक्षाने सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे.

ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात शिवलिंग असल्याचा दावा हिंदूंच्या वतीने करण्यात आला होता. त्यावर सुप्रीम कोर्टाने हा परिसर प्रतिबंधित करण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत.

मात्र, हिंदू पक्षाने पुन्हा एकदा ज्ञानवापीला इजा न करता हे सर्वेक्षण शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात यावे, असा अर्ज सुप्रीम कोर्टात दाखल केला आहे. वादग्रस्त जागेतील वजूखाना सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर संरक्षित करण्यात आला आहे. तो भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे. तिथे आधी विश्वेश्वराचे शिवलिंग असल्याचा दावा हिंदू पक्षाकडून केला जात आहे. मात्र, ते कारंजे असल्याचा दावा मुस्लीम पक्षाकडून केला जात आहे.

दरम्यान, या भागाचे मुस्लीम समाजासाठी कोणतेही धार्मिक महत्त्व नाही. कारण त्यांच्या मते तेथे एक कथित कारंजे आहे. पीठ, पीठिका इत्यादी शिवलिंगाशी निगडित मूळ वैशिष्ट्ये लपवण्यासाठी हे आधुनिक बांधकाम जाणीवपूर्वक केले गेले आहे. शिवलिंगाचा परिसर कृत्रिम भिंती उभारून लपवण्यात आल्याचा दावा हिंदू पक्षाने केला आहे. तसेच ज्ञानवापी येथील प्रतिबंधित केलेले क्षेत्र खुले करावे. प्रतिबंधित जागेत सर्वेक्षण करण्यास बंदी घालणारा आदेश मागे घ्यावा. वादग्रस्त जागेवर कृत्रिम भिंतींनी प्रतिबंधित केलेली वाराणसी मशिदीची १० तळघरे खुली करावीत. त्या ठिकाणी पुरातत्त्व खात्यामार्फत वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची परवानगी द्यावी, अशा मागण्या हिंदू पक्षाने आपल्या याचिकेत केल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in