एलएसीवर परिस्थिती संवेदनशील; लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांची कबुली

लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर गेल्या काळात घुसखोरीचे अनेकदा प्रयत्न झाले आहेत.
एलएसीवर परिस्थिती संवेदनशील; लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांची कबुली
Published on

नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या उत्तर सीमेवर परिस्थिती अजूनही संवेदनशील असल्याचे भारताचे खुद्द लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी कबूल केले आहे. चीनशी पूर्व लडाखबाबत वाद अद्याप मिटला नसून परिस्थितीचा सामना करण्यासाठी चीनच्या सीमेवर पुरेसे सैन्य तैनात आहे, असेही जनरल पांडे यांनी म्हटले आहे.

पूर्व लडाखमधील एलएसीवर परिस्थिती संवेदनशील परिस्थितीबाबत जनरल पांडे म्हणाले, ‘‘पूर्व लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर गेल्या काळात घुसखोरीचे अनेकदा प्रयत्न झाले आहेत. अजूनही सीमेपलीकडून हालचाली सुरू आहेत. उत्तर सीमेवर शांतता आहे, मात्र परिस्थिती पूर्णपणे निवळलेली नाही. तेथील वातावरण संवेदनशील आहे. आमचे सीमेपलीकडील हालचालींवर बारकाईने लक्ष आहे. पूर्व लडाखमध्ये एलएसीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चर्चा सुरू आहे. २०२३ मध्ये देशाच्या सीमेवरील हिंसाचाराच्या घटना कमी झाल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये एलओसीवर घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडले जात आहेत. तसेच जम्मू-काश्मीरच्या अंतर्गत भागामध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्येही घट नोंदवली गेली आहे.’’ लष्करप्रमुखांनी सांगितले की, ‘‘भारतीय लष्कराने राष्ट्रहितासाठी मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. लष्करामध्ये वेळेच्या मागणीनुसार आधुनिक इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरला अधिक सामंजस्यपूर्ण आणि भक्कम बनवण्यात आले आहे. सरकार आणि लष्कर अशा संयुक्त प्रयत्नांमुळे मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर शांतता प्रस्थापित झाली आहे.’’

लष्कराच्या आधुनिकीकरणावर भर

जनरल पांडे म्हणाले की, ‘‘लष्करात अग्निवीरांना भरती करून घेण्याची प्रक्रिया चांगल्या पद्धतीने राबवली जात आहे. दुसरीकडे संरक्षण दलांचे आधुनिकीकरण करण्याचे कामही तितक्याच गतीने सुरू आहे. २०२४ हे वर्ष भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी महत्त्वाचे वर्ष असेल. नव्या तंत्रज्ञानासह उत्तम दळणवळण आणि संचार व्यवस्था, ड्रोन आणि सर्व्हिलेंस समाविष्ट केले जात आहे. भारतीय लष्कर देशातील विविध सुरक्षा यंत्रणा आणि राज्याच्या सरकारांसोबत मिळून काम करत राहील, असेही त्यांनी सांगितले.’’

logo
marathi.freepressjournal.in