पाचही राज्यांत कांटे की टक्कर ;सर्व एक्झिट पोल्सच्या अंदाजात भिन्नता

पाच राज्यांच्या निवडणुकीत वेगवेगळ्या पाच ते सहा संस्थांनी एक्झिट पोल घेतले. यात राजस्थानात सत्तापालटाची परंपरा याहीवेळी कायम राहील, असा अंदाज आहे.
पाचही राज्यांत कांटे की टक्कर ;सर्व एक्झिट पोल्सच्या अंदाजात भिन्नता
@ANI

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी गुरुवारी तेलंगणातील शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर सांगता झाली. या पाचही राज्यांची मतमोजणी रविवार, ३ डिसेंबरला होणार आहे. तत्पूर्वी गुरुवारी पाचही राज्यांचे एक्झिट पोल प्रसिद्ध झाले आहेत. यामध्ये बहुतेक एक्झिट पोलनी वर्तवलेल्या अंदाजानुसार पाचही राज्यांमध्ये कांटे की टक्कर असल्याचेच स्पष्ट होत आहे. छत्तीसगड वगळता कोणत्याही राज्यात कोणा एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, असे अंदाज वर्तवले गेलेले नाहीत. छत्तीसगडमध्ये मात्र बहुतेक अंदाज काँग्रेस सत्ता स्थापन करेल, असे आहेत. मात्र, त्यातही घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. तेलंगणात के. चंद्रशेखर राव यांची सत्ता जाण्याची शक्यता आहे. तर मध्य प्रदेशात भाजप सत्ता कायम राखेल आणि राजस्थानात सत्ता मिळवेल, असेही अंदाज वर्तवण्यात आले आहेत. मिझोराममध्ये झोरम पिपल्स मुव्हमेंट या प्रादेशिक पक्षाला बहुमत मिळण्याचा अंदाज काही एक्झिट पोल्सनी वर्तवला आहे, तर काहींनी त्रिशंकू विधानसभेची शक्यता वर्तवली आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकीत वेगवेगळ्या पाच ते सहा संस्थांनी एक्झिट पोल घेतले. यात राजस्थानात सत्तापालटाची परंपरा याहीवेळी कायम राहील, असा अंदाज आहे. चारही एक्झिट पोलनी भाजप सरकार स्थापनेचे संकेत दिले आहेत. काँग्रेसची मजल ६० ते ९० जागांपर्यंतच असेल, असा अंदाज वर्तवला आहे, तर मध्य प्रदेशात ६ पैकी ४ एक्झिट पोल्सनी भाजपलाच पुन्हा सत्ता मिळेल, असा अंदाज वर्तवला आहे. दोन पोलनी काँग्रेस सरकार स्थापन करण्याची शक्यता वर्तवली आहे. छत्तीसगडमध्ये सातही एक्झिट पोलनी काँग्रेस सरकार स्थापनेचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, भाजप काँग्रेसला कडवी टक्कर देईल, असाही अंदाज आहे.

तेलंगणात काँग्रेस सत्तेच्या जवळ जाईल, पण स्थिती त्रिशंकू असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाची मात्र पिछेहाट होईल, असे बहुतेक पोलमध्ये म्हटले आहे. इथे भाजप आपले खाते उघडण्याचा आणि सत्ता स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावेल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. मिझोराममध्येही कोणालाच बहुमत मिळणार नाही, मात्र, झोरम पीपल्स मुव्हमेंट हा प्रादेशिक पक्ष सरकार स्थापन करेल, असा अंदाज आहे.

एक्झिट पोल

मध्य प्रदेश

एकूण जागा २३०

बहुमत ११६

भाजप ९५-११५

काँग्रेस १०५-१२०

समाजवादी पार्टी ००

इतर १५

राजस्थान

एकूण जागा १९९

बहुमत १००

भाजप ९८-१०५

काँग्रेस ८५-९५

इतर १०-१५

तेलंगणा

एकूण जागा ११९

बहुमत ६०

भारत राष्ट्र समिती ४०-५५

काँग्रेस ४८-६४

भाजप ७-१३

छत्तीसगड

एकुण जागा ९०

बहुमत ४६

भाजप ३५-४५

काँग्रेस ४५-५५

जनता काँग्रेस ०-१०

मिझोराम

एकूण जागा ४०

बहुमत २१

मिझो नॅशनल फ्रंट १०-१४

काँग्रेस ५-९

झोरम पिपल्स मुव्हमेंट १५-२५

logo
marathi.freepressjournal.in