भाजप प्रतिनिधी मंडळाची नूहला भेट कॉँग्रेस, आपच्या प्रतिनिधींना रोखले

११ ऑगस्टपर्यंत इंटरनेट सेवा बंद, संचारबंदी सुरुच
भाजप प्रतिनिधी मंडळाची नूहला भेट कॉँग्रेस, आपच्या प्रतिनिधींना रोखले

चंदीगड : कॉंग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाला नूंहमध्ये प्रवेश नाकारुन मंगळवारी माघारी पाठवण्यात आले तर बुधवारी आम आदमी पक्षाच्या प्रतिनिधींना देखील माघारी पाठवण्यात आल्यानंतर भाजपच्या प्रतिनिधी मंडळाला बुधवारी नूह मध्ये प्रवेश देण्यात आला. नूहमध्ये ब्रज मंडळ यात्रेदरम्यान झालेल्या हिंसेनंतर संचारबंदी लागू आहे. मात्र नागरिकांना गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी सकाळी ९ ते दुपारी १ वाजे पर्यंत संचारबंदी शिथिल केली जाते. तसेच नूंह जिल्ह्यात ११ ऑगस्ट पर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

बुधवारी भारतीय जनता पक्षांच्या प्रतिनिधी मंडळाला नूंह सीमेऐवजी सर्किट हाऊसपर्यंत जाण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश धनखड यांच्यासोबत कॅबिनेट मंत्री डॉ. बनवारीलाल व आमदार मोहनलाल बडोली, संजय सिंह, मेवात जिल्हाप्रभारी समय सिंह भाटी मंडळी दोन गाड्यांमध्ये बसून सर्किट हाऊसमध्ये पोहोचली. यावेळी संजय सिंह म्हणाले की ३१ जुलै रोजी झालेल्या घटनेचा दिवस कलंकित होता. ही दंगल पूर्णपणे सुनियोजित होती. ज्या लोकांची दुकाने फोडली आहेत, जाळपोळ झाली आहे त्यांनाच भेटायला जात आहोत. दंगलग्रस्त भाग अजूनही सामान्य झालेला नाही. तेथे शांतता राखण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न केले जात आहेत. म्हणूनच संचारबंदी सुरु ठेवण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक सतत परिस्थितीवर नियंत्रण ठेवत आहेत. दंगलग्रस्त क्षेत्रात पोलीस जवान तैनात आहेत. नूंहमध्ये आतापर्यंत १४२ एफआयर दाखल झाले असून ३१२ जणांना अटक करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in