नवी दिल्ली : हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी आपने सोमवारी आपल्या २० उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करून काँग्रेससमवेत आघाडी करण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. हरयाणा विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.
पहिल्या दिवसापासूनच आम्ही ९० जागा स्वबळावर लढण्याची तयारी करीत होतो, निवडणुकीसाठी आता जास्त कालावधी राहिलेला नाही. १२ सप्टेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा संपली आहे, असे हरयाणा आपचे अध्यक्ष सुशील गुप्ता यांनी सांगितले.
हरयाणामध्ये आप हा समर्थ पर्याय आहे. पक्षाची दुसरी यादी लवकरच जाहीर केली जाईल. हरयाणा निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढल्या जातील, असे पक्षाने म्हटले आहे. हरयाणामध्ये आपने किती जागा लढवायच्या यावर काँग्रेसशी सुरू असलेली चर्चा थांबली. आपने १० जागांची मागणी केली होती तर काँग्रेसने पाच जागा देण्याचा प्रस्ताव आपसमोर ठेवला होता.