काँग्रेस व आपचे दिल्लीतील जागावाटप अंतिम टप्प्यात; गोवा, गुजरातमध्येही युतीच्या आणाभाका

राष्ट्रीय राजधानीतील लोकसभेच्या सातही जागा सध्या भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहेत. युतीबाबतची चर्चा लांबली आहे.
काँग्रेस व आपचे दिल्लीतील जागावाटप अंतिम टप्प्यात; गोवा, गुजरातमध्येही युतीच्या आणाभाका

नवी दिल्ली : दिल्लीतील जागावाटपाबाबत आप आणि काँग्रेस यांच्यातील लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून दोन्ही पक्षांमधील जागावाटपाचे सूत्र जवळपास नक्की झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. केवळ इतकेच नव्हे, तर दिल्लीशिवाय इतर राज्यांमध्येही युतीचा निर्णय झाला आहे.

प्रत्येक पक्षाने लढवल्या जाणाऱ्या जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. आप दक्षिण दिल्ली, पश्चिम दिल्ली, उत्तर पश्चिम दिल्ली आणि नवी दिल्ली या जागांवर उमेदवार उभे करील तर काँग्रेस चांदनी चौक, पूर्व दिल्ली आणि उत्तर पूर्व दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवेल, असे आम आदमी पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.

राष्ट्रीय राजधानीतील लोकसभेच्या सातही जागा सध्या भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहेत. युतीबाबतची चर्चा लांबली आहे. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसांत नव्या घडामोडींचे संकेत 'आप'चे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत. लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मेमध्ये होण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीशिवाय इतर राज्यांमध्येही युतीचा निर्णय झाला आहे. दिल्लीत आम आदमी पक्ष ४ जागांवर, तर काँग्रेस ३ जागांवर निवडणूक लढवणार आहे. गुजरातमध्ये काँग्रेसने आम आदमी पक्षाला दोन जागा दिल्या आहेत. आम आदमी पक्षाचे उमेदवार गुजरातमधील भरूच आणि भावनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

आम आदमी पक्षाने चंदिगडची जागा काँग्रेसला दिली. गोव्यात आम आदमी पक्षाने दक्षिण गोव्याच्या जागेवर आपला उमेदवार जाहीर केला होता, मात्र आता आम आदमी पक्ष ही जागा काँग्रेससाठी सोडणार आहे. काँग्रेस हरयाणातील एक जागा आम आदमी पक्षाला देणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

दुसरीकडे, पंजाबमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने परस्पर निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सीएम केजरीवाल त्यावेळी म्हणाले होते की, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in