

नवी दिल्ली : दिल्लीतील पंतप्रधान निवासाबाहेर विरोधकांनी केलेल्या धरणे आंदोलनानंतर देशाच्या विविध राज्यांमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने येऊन काही ठिकाणी हिंसक घटनाही घडल्या.
बुधवारी उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी लखनऊमध्ये एकमेकांविरोधात स्वतंत्र मोर्चे काढले. या संघर्षामुळे शहरात दिवसभर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. काँग्रेसचे हे आंदोलन "राष्ट्रविरोधी" आणि बेजबाबदार असल्याचा आरोप करत भाजपने काँग्रेस प्रदेश कार्यालयाला घेराव घालण्यासाठी मोर्चा काढला. तर दुसरीकडे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना आंदोलनादरम्यान पोलिसांनी बळजबरीने हटवून गैरवर्तन केल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री निवासावर धडक देण्याचा प्रयत्न केला.
चकमक, अश्रूधूर आणि लाठीमार
पाटणा : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत बिहारमध्ये बुधवारी शेकडो विद्यार्थी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये तीव्र धुमश्चक्री पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांना 'राजभवन मार्च' काढण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूर, पाण्याच्या फवाऱ्यांचा (वाटर कॅनन) मारा केला आणि जोरदार लाठीमार केला. 'ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन'शी संबंधित असलेले हे आंदोलक बंदी घातलेल्या अति-सुरक्षित क्षेत्रात घुसले आणि महत्त्वाच्या शासकीय इमारतींच्या अगदी जवळ पोहोचले.