यापुढे राहुल गांधींसह काँग्रेस सावरकरांवर टीका करणे टाळणार? उद्धव ठाकरेंच्या दबावानंतर हालचाली

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून आता महाविकास आघाडीमध्ये आता मोठी खलबते पाहायला मिळत असताना काँग्रेस या मुद्द्याला बगल देण्याची चर्चा
यापुढे राहुल गांधींसह काँग्रेस सावरकरांवर टीका करणे टाळणार? उद्धव ठाकरेंच्या दबावानंतर हालचाली

काँग्रेससह पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी अनेकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त विधाने केली आहेत. नुकतेच, राहुल गांधींनी एका पत्रकार परिषदेत सावरकरांचा उल्लेख करत, "मी सावरकर नाही, मी गांधी आहे, आणि मी माफी मागणार नाही," असे विधान केले. यावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनीही त्यांना, "सावरकरांचा अपमान सहन करणार नाही," असा इशारा दिला. यानंतर ठाकरे गट हा काँग्रेसच्या सावरकरांवरील भूमिकेवर आक्रमक झाला. या सर्व घडामोडीवरून आणि उद्धव ठाकरेंच्या दबावामुळे आता काँग्रेस आणि राहुल गांधी हे सावरकरांच्या मुद्द्याला बगल देणार असल्याची चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक पार पडली. यावेळी या बैठकीला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अन्य समाजवादी, जेडीयु खासदार उपस्थित होते. मात्र, या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते उपस्थित नव्हते. काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीमध्ये राहुल गांधींच्या मुद्द्यावर बोलणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरणावर केलेल्या विधानामुळे महाविकास आघाडीतील वातावरण चांगलेच तापले आहे. अशामध्ये आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील सावरकरांच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संबंध नाही. सावरकरांना माफीवीर म्हणणेही योग्य नाही," असे मत त्यांनी मांडले आहे. तसेच, भाजपवर मात करायची असेल तर विरोधी पक्षांमध्ये फूट पडायला नको, अशी भूमिका कालच्या बैठकीमध्ये घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in