काँग्रेसची बँक खाती पुन्हा खुली; प्राप्तिकर अपीलीय लवादाची कारवाई

सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांच्या निवडणूक रोख्यांची योजना रद्द केल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी काँग्रेसने त्यांच्या पक्षाची बँक खाती प्राप्तिकर खात्याकडून गोठवली गेल्याचा दावा केला.
काँग्रेसची बँक खाती पुन्हा खुली; प्राप्तिकर अपीलीय लवादाची कारवाई

नवी दिल्ली : देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राप्तिकर खात्याने पक्षाची बँक खाती गोठवल्याचा आरोप बुधवारी काँग्रेसने केला. काँग्रेसने तातडीने प्राप्तिकर अपीलीय लवादाकडे दाद मागितल्यानंतर बँक खाती पुन्हा खुली करण्यात आली. या प्रकरणी लवादासमोर पुढील सुनावणी येत्या बुधवारी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांच्या निवडणूक रोख्यांची योजना रद्द केल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी काँग्रेसने त्यांच्या पक्षाची बँक खाती प्राप्तिकर खात्याकडून गोठवली गेल्याचा दावा केला. प्राप्तिकर खात्याने काँग्रेसला २१० कोटी रुपयांचा कर भरण्यास सांगितल्याप्रकरणी ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसचे खजिनदार अजय माकन यांनी पत्रकार परिषद आयोजित करून सांगितले की, ही कृती म्हणजे देशातील लोकशाहीला बसलेला मोठा धक्का आहे. बँकेच्या नियमांनुसार पक्षाच्या खात्यात ११५ कोटी रुपयांची किमान रक्कम कायम ठेवणे बंधनकारक आहे, असे काँग्रेसतर्फे स्पष्ट करण्यात आले. सत्ताधारी भाजपने राजकीय आकसापोटी ही कारवाई केल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. यानंतर काँग्रेसने प्राप्तिकर अपीलीय लवादाकडे धाव घेतली. लवादाने दिलेल्या आदेशानंतर काँग्रेसची बँक खाती पुन्हा खुली करण्यात आली.या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या बुधवारी होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in