भाजपच्या गुंडांकडून 'भारत जोडो न्याय यात्रे'वर हल्ला; काँग्रेसचा गंभीर आरोप: व्हिडिओ केला शेअर

हा हल्ला भाजपच्या गुंडांकडून करण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. तसेच, कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.
भाजपच्या गुंडांकडून 'भारत जोडो न्याय यात्रे'वर हल्ला; काँग्रेसचा गंभीर आरोप: व्हिडिओ केला शेअर

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात मणिपूरमधून सुरु झालेल्या 'भारत जोडो न्याय यात्रे'वर आसाममध्ये हल्ला करण्यात आला आहे. यावेळी रस्त्याच्या कडेला लावलेले बॅनर फाडण्यात आले आहेत. तसेच, काही गाड्यांची तोडफोड़ केल्याचेही सांगण्यात येत आहे. हा हल्ला भाजपच्या गुंडांकडून करण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. तसेच, कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.

आज काँग्रेसच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'चा सातवा दिवस आहे. अरुणाचल प्रदेशात प्रवेश करण्यापूर्वी ही यात्रा तीन दिवस आसामच्यामधून जात होती. याचदरम्यान, काल रात्री(19 जानेवारी) यात्रा आसामच्या लखीमपूरमधून जात असताना यात्रेवर हल्ला करण्यात आला. यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद बघून भाजप घाबरले आहे, त्यामुळे हा हल्ला करण्यात आल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. काँग्रेसने एक व्हिडिओ ट्विट करत भाजप तसेच आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर आरोप केले आहेत.

"आसामच्या लखीमपूरमध्ये 'भारत जोडो न्याय यात्रे'वर भाजपच्या गुंडांनी हल्ला केला आहे. भाजपच्या गुंडांनी भारत जोडो न्याय यात्रेतील बॅनर फाडले आणि गाड्यांची तोडफोड केली. या भ्याड आणि लज्जास्पद कृत्यावरून भाजप सरकार 'भारत जोडो न्याय यात्रे'ला मिळत असलेले प्रेम आणि लोकांचे समर्थन पाहून घाबरले आहे हे दिसते. पण, मोदी सरकार आणि त्यांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या आसामच्या मुख्यमंत्र्यांनी हे समजून घ्यावे. ही भारताची यात्रा आहे, ही अन्यायाविरुद्ध न्यायाची यात्रा आहे. 'भारत जोडो न्याय यात्रे'ला कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही. न्याय आणि हक्क मिळेपर्यंत ही यात्रा सुरु राहील", असे ट्विट काँग्रेसकडून करण्यात आले आहे.

कायदेशीर कारवाई करु-

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून या हल्ल्याचा निषेध केला आहे. गेल्या 10 वर्षात भाजपने देशातील जनतेला संविधानाने दिलेला प्रत्येक अधिकार आणि न्याय पुसून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपला जनतेचा आवाज दाबायचा आहे आणि यातून लोकशाही काबीज करायची आहे. आसामधील भाजप सरकारच्या या हल्ल्यांना काँग्रेस घाबरत नाही. भाजपच्या गुंडांवर कायदेशीर कारवाई करू, असे खरगे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in