
महाराष्ट्रातील सत्तापालटाची पुनरावृत्ती गोव्यात होण्याचा कट काँग्रेसने उलथवून लावला असला तरी हे बंड अद्याप शमलेले नाही. १८ जुलैला होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून काँग्रेसने आपल्या पाच आमदारांना चेन्नई मुक्कामी पाठविले आहे. या पाच आमदारांमध्ये संकल्प आमोणकर, युरी आलेमाव, रुडॉल्फ फर्नांडिस, एल्टन डिकॉस्टा आणि कार्लोस फेरेरा यांचा समावेश आहे.
महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातही माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्या नेतृत्वाखाली घडामोडी घडणार होत्या. दोन तृतीयांश आमदार फोडून काँग्रेसचा विधिमंडळ गट भाजपात विलीन करण्याचे प्रयत्न कामत आणि लोबो या दोन्ही नेत्यांनी अखेरपर्यंत चालू ठेवले होते. काँग्रेसच्या या बंडात सुरुवातीला दिगंबर कामत, मायकेल लोबो, दिलायला लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई व कार्लोस फेरेरा हे सहा आमदार होते. त्यात आमदार आलेक्स सिक्वेरा हेही सामील झाले; मात्र दोन तृतीयांश आमदारांचा कोटा पूर्ण करण्यासाठी आठवा आमदार न मिळाल्याने काँग्रेसमधील हे बंड तूर्तास गुंडाळले असल्याचे बोलले जात आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून या आमदारांना चेन्नई मुक्कामी पाठविले आहे.