काँग्रेस केंद्रीय कार्यकारिणीची बैठक सोमवारी

आगामी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका याबाबत धोरण ठरवण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे.
काँग्रेस केंद्रीय कार्यकारिणीची बैठक सोमवारी
Published on

जाल खंबाटा / नवी दिल्ली : कॉँग्रेस पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक सोमवारी घेण्यात येणार आहे. देशातील सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचा उहापोह, जातनिहाय जनगणना आणि आगामी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका याबाबत धोरण ठरवण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे.

कॉंग्रेस पक्षाला राजस्थान व छत्तीसगढ या राज्यांतील सत्ता टिकवून ठेवायची आहे, तर मध्य प्रदेशात भाजप, तेलंगणात बीआरएस आणि मिझो नॅशनल फ्रंटला मिझोराममध्ये सत्तेत येण्यापासून रोखायचे आहे. कॉंग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीस राजस्थान, छत्तीसगढ, कर्नाटक, हिमाचल प्रदेश या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. कॉंग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जुन्याजाणत्यांचा मान राखून तरुणांनाही प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारे ८४ सदस्यांची नवी कार्यकारिणी स्थापन केली आहे. या कार्यकारिणीची पहिली बैठक १६ सप्टेंबर रोजी हैदराबाद शहरात झाली होती. सोमवारची बैठक दिल्लीतील या कार्यकारिणीची पहिलीच बैठक ठरणार आहे. कार्यकारिणीत ३९ नियमित सदस्य, ३२ कायमस्वरूपी निमंत्रित सदस्य व १३ विशेष निमंत्रित सदस्य आहेत. कार्यकारिणीत जातनिहाय जनगणनेवर सविस्तर चर्चा होणार आहे. कारण पक्षाने या जनगणनेला भक्कम पाठिंबा दिला आहे. तसेच सीबीआय, ईडी आणि आयटी या संस्थांकडून इंडिया आघाडीतील सदस्यांवर टाकण्यात येणाऱ्या धाडींचा निषेध या बैठकीत करण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in