
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्यावर शंका उपस्थित केली आणि काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहून ५० जागांबाबत प्रश्न उपस्थित केले होते. या ठिकाणी जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत ५० हजार मतदार जोडल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र आता निवडणूक आयोगाने प्रत्येक जागेची चौकशी करून काँग्रेसला सविस्तर उत्तर पाठवले असून सर्व दावे खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे.
निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, विधानसभेच्या ५० जागांवर जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत ५० हजार मतदार जोडण्यात आल्याचा काँग्रेसने केलेला आरोप चुकीचा आहे, असा कोणताही प्रकार घडलेला नाही. आम्ही प्रत्येक जागेचे तपशील तपासले आहेत. जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत ५० हजार मतदारांची भर पडली, मात्र ती केवळ ६ विधानसभा जागांसंदर्भात होती, असे म्हटले आहे.
मतदान कमी असूनही जास्त दाखवले जात असल्याचा दावा काँग्रेसने केला होता. मतदारांच्या संख्येत बदल होत आहेत, अचानक जास्त मतदान होताना दिसत आहे, असे काँग्रेसने म्हटले होते आणि त्याच्या पुष्ट्यर्थ म्हटले होते की, संध्याकाळी ६ वाजता मतदान झाल्यानंतर मतदानाचे प्रमाण काही वेगळे असल्याचे सांगितले जाते आणि नंतर मतदान ४ ते ५ टक्क्यांनी वाढल्याचे दाखवले जाते. यावर निवडणूक आयोगाने म्हटले की, मतदारांच्या संख्येत बदल होणे अशक्य आहे. कारण मतदानाच्या समाप्तीच्या वेळी मतदानाच्या टक्केवारीची माहिती उमेदवाराच्या प्रतिनिधीकडे अर्ज १७ सी मध्ये नोंदवलेली असते, काँग्रेस ते तपासून पाहू शकते.
काँग्रेसने जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत ५० मतदारसंघांत ५० हजार मतदार जोडले होते, असा दावा केला होता. या ५० जागांपैकी भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीने ४७ जागांवर निवडणूक जिंकली. कारण मतदानाचा खेळ खेळला गेला. मात्र आता निवडणूक आयोगाने प्रत्येक दाव्याला उत्तर दिले आहे. यापूर्वी काँग्रेसने ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले होते, या प्रश्नांना निवडणूक आयोगाने उत्तर दिले होते. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले होते की, राज्यातील सर्व २८८ विधानसभा जागांवर १४४० व्हीव्हीपॅट पावतीची मोजणी करण्यात आली आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पावतीच्या मोजणीत कोणतीही अनियमितता आढळली नाही.