नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्यावतीने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह घोषणाबाजी करण्यात आली, त्याचे तीव्र पडसाद सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले. या आक्षेपार्ह घोषणाबाजीप्रकरणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी माफी मागावी, अशी आग्रही मागणी भाजपने केली. मात्र, मेळाव्यात कोण काय म्हणाले, याबद्दल अनभिज्ञ असल्याचे काँग्रेस खासदार प्रियांका गांधी-वढेरा म्हणाल्या. यावरून सोमवारी लोकसभा आणि राज्यसभेत जोरदार गदारोळ झाला आणि कामकाज काही वेळासाठी स्थगित करावे लागले.
संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी याच घोषणांचा लोकसभेत उल्लेख करत काँग्रेसला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. स्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित केले.
रविवारी काँग्रेसच्या रॅलीमध्ये मोदींविरोधातील घोषणा ऐकायला मिळाल्या, ‘मोदी तेरी कब्र खुदेगी, आज नहीं तो कल खुदेगी’, अशा घोषणा दिल्या गेल्या.