भारत मंडपममध्ये पाणीच पाणी विकास पोहत असल्याची काँग्रेसची टीका

गुंतवलेले २७०० कोटी रुपये एका पावसाच्या पाण्यात वाहून गेले
भारत मंडपममध्ये पाणीच पाणी विकास पोहत असल्याची काँग्रेसची टीका

नवी दिल्ली : जी-२० शिखर परिषदेची रविवारी सांगता झाली आहे. मात्र, दिल्लीत पावसाच्या आगमनाने परदेशी पाहुण्यांना पाण्यात बुडालेला भारत मंडपम् पाहावा लागला आहे. विकास पोहत असल्याची टीका करत यूथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे.

“जी-२० च्या सदस्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेल्या भारत मंडपमची ही दृश्ये पाहा. विकास पोहत आहे,” असे कॅप्शन देत श्रीनिवास यांनी पाण्याखाली गेलेल्या भारत मंडपमचा व्हिडीओ शेअर केला आहे. “पोकळ विकास उघड झाला. जी-२० साठी भारत मंडपम् तयार करण्यात आला होता. त्यासाठी गुंतवलेले २७०० कोटी रुपये एका पावसाच्या पाण्यात वाहून गेले,” असेही त्यांनी म्हटले आहे.

जी-२० परिषदेसाठी जगभरातील नेते आणि विविध देशांचे प्रतिनिधी भारतात आले होते. त्यांच्या स्वागतासाठी भारताने प्रचंड मेहनत घेतली होती. आधुनिक भारताची ओळख या माध्यमातून जगाला दाखवून देण्याचा प्रयत्न भारताकडून करण्यात आला. परदेशी पाहुण्यांचे आदरातिथ्य, पाहुणचार, जेवणावळी या सर्व बाबींवर जाणीवपूर्वक लक्ष ठेवण्यात आले होते.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना, जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासह अनेक दिग्गज नेते आणि प्रतिनिधी दोन दिवसीय शिबिरासाठी भारतात आले होते. विमानतळावर पारंपरिक नृत्य-संगीताने त्यांचे स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी स्वागतादरम्यान वाद्यांच्या तालावर ठेका धरला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in