

नवी दिल्ली: उत्तर प्रदेश विधान परिषद निवडणुकीच्या मतदार यादीत त्रुटी आढळल्यानंतर, काँग्रेसने शनिवारी देशातील मतदार याद्यांची निष्पक्ष चौकशी करण्याची आणि 'एसआयआर' प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली.
भाजपला मदत करण्याच्या उद्देशाने रचलेल्या 'पूर्व नियोजित कटासाठी' निवडणूक आयोग सॉफ्टवेअरला दोष देऊ शकत नाही. कारण मतदार याद्यांची विश्वासार्हता पूर्णपणे सॉफ्टवेअरवर अवलंबून राहिली आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या त्वरित राजीनाम्याची मागणी करतानाच, निवडणूक आयोगाशी संगनमत करून भाजपने २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका आणि अनेक विधानसभा निवडणुका 'चोरल्या' आहेत, असा आरोप रमेश यांनी केला आहे. 'भाजपला मदत करण्यासाठी रचलेल्या पूर्व नियोजित कटाचे खापर निवडणूक आयोग सॉफ्टवेअरवर फोडण्याचा प्रयत्न करत आहे जे अजिबात स्वीकारार्ह नाही, असेही त्यांनी ठणकावले आहे. मतदारांच्या नावांमध्ये आढळलेल्या विसंगतींचा उल्लेख करून ते म्हणाले की, 'राम ने यादव को मारा', 'मूर्ख चंद्र यादव' आणि 'बी. कॉम' अशी नावे यादीत आली आहेत. जर उत्तर प्रदेश विधान परिषद निवडणुकीत अशा प्रकारच्या 'त्रुटी' समोर आल्या असतील, तर इतर निवडणुकांमध्ये अशा त्रुटी घडल्या नाहीत, असा दावा कसा केला जाऊ शकतो ?
भारताच्या लोकशाहीची आणि मतदार यादीची विश्वासार्हता पूर्णपणे सॉफ्टवेअर आणि 'ईसीआयनेट' वर सोडून देण्यात आली आहे का?" ही जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे, सॉफ्टवेअरची नाही,' असे रमेश यांनी आपल्या पोस्टमध्ये ठामपणे म्हटले आहे.
यापूर्वी पीलीभीतमध्ये मतदारांची माहिती चोरल्याचा प्रकार समोर आला होता. तिथे निवडणूक आयोगाच्या 'फॉर्म ८' द्वारे १०,४७० मतदारांच्या तपशिलात बदल करण्यात आले होते, तर हे बदल करण्यासाठी कोणताही आधारभूत दस्तऐवज उपलब्ध नव्हता. ज्या मतदारांच्या तपशिलात 'बदल' करण्यात आले, त्यापैकी बहुतांश मतदार एका विशिष्ट समुदायातील आहेत, ज्यांना भाजपने 'सतत लक्ष्य केले आहे,' असा आरोप त्यांनी केला.
मतदानापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान
या त्रुटींमुळे, मतदानाच्या वेळी या लोकांना त्यांच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान असावे, असा संशय निर्माण होतो. याव्यतिरिक्त, 'एसआयआर 'नंतर प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीतून नावे गायब असणे आणि ऑनलाइन 'ईपीआयसी' क्रमांक शोधताना चुकीची माहिती दिसणे, अशा तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत,' असे रमेश यांनी निदर्शनास आणले.