मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता ;झी न्यूज सी फोरचा ओपिनियन पोल अहवाल

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता ;झी न्यूज सी फोरचा ओपिनियन पोल अहवाल

मतदानाला २० दिवसांचा वेळ बाकी असताना झी न्यूज सी फोर या संस्थेचा ओपिनियन पोल अहवाल समोर आला आहे

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला सत्ता मिळू शकते, असे ओपिनियन पोल झी न्यूज -सी फोर संस्थेने जाहीर केल्याने भाजपच्या गोटात चिंतेचे धुके दाटले आहे. नोव्हेंबर महिन्यात देशातील मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने या पाच राज्यांची निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. त्यातही मध्य प्रदेश हे राज्य भाजपसाठी महत्त्वाचे आहे. तिथलीच सत्ता जाणार असल्याचा अंदाज ओपिनियन पोलमधून व्यक्त झाल्याने भाजप टेन्शनमध्ये आहे.

मध्य प्रदेशमध्ये २३० जागांसाठी एकाच टप्प्यात १७ नोव्हेंबरला मतदान होत आहे. मतदानाला २० दिवसांचा वेळ बाकी असताना झी न्यूज सी फोर या संस्थेचा ओपिनियन पोल अहवाल समोर आला आहे. यामध्ये काँग्रेसला सर्वाधिक १३२ ते १४६ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर भाजपला ८४ ते ९८ जागा मिळतील तर इतरांना ५ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मतांच्या टक्केवारीमध्ये देखील काँग्रेस आघाडीवर राहू शकते. काँग्रेसला ४६ टक्के मते मिळतील, तर भाजपला ४३ टक्के मते मिळतील. अपक्ष आणि इतरांना ११ टक्के मतं मिळतील, असे या अहवालात म्हटले आहे. मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत महागाईचा मुद्दा प्रभावी असेल, असे सर्व्हेच्या आकडेवारीतून दिसत आहे. सर्व्हेच्या अंदाजानुसार महागाईचा मुद्दा २५ टक्के लोकांना, तर बेरोजगारी २४ टक्के लोकांना महत्त्वाचा वाटला. भ्रष्टाचाराचा मुद्दा १२ टक्के लोकांना महत्त्वाचा वाटला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in