
काँग्रेसला (Congress) आणि खासदार राहुल गांधींना (Rahul Gandhi) मोठा झटका बसला आहे. कारण, माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए.के अँटनी ( AK Antony) यांचे पुत्र अनिल अँटनी (Anil Antony) यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीवर आधारित बीबीसीच्या माहितीपटास विरोध दर्शवत, मोदींचे समर्थन केले होते. अनिल अँटनी यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली असून राहुल गांधींसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
अनिल अँटनी यांनी ट्विट केले की, “मी काँग्रेसमधील माझ्या सर्व पदांचा राजीनामा देत आहे. माझ्यावर एक ट्वीट डिलीट करण्यासाठी दबाव टाकला गेला होता. तोही त्यांच्याकडून जे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी उभे राहण्यासाठी बोलत असतात, मी त्यांना स्पष्ट नकार दिला." असे ट्विट त्यांनी केले.
अनिल अँटनी यांनी ट्वीट करत या माहितीपटाला जाहीर विरोध दर्शवला होता. "भाजपशी आमचे वैचारिक मतभेद आहेत. मात्र, तरीही मला वाटते की या माहितीपटामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होऊ शकतो. जे लोकं बीबीसी आणि ब्रिटनचे माजी परराष्ट्र सचिव जॅक स्ट्रॉचे समर्थन करत आहेत, ते लोक चुकीचा पायंडा पाडत आहेत," असे ट्विट करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.