
देशभरात आता लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी लोकसभेसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अशामध्ये काँग्रेसकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असणार? याबाबत चर्चा सुरु आहेत. अशामध्ये काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांना काँग्रेसकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार करा, अशी मागणी काँग्रेसचे नेते प्रमोद कृष्णम यांनी केली आहे. सर्वच विरोधी पक्षांनी या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, असेदेखी आवाहन केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसची कमान ही राहुल गांधींऐवजी प्रियांका गांधींकडे सोपवावी, अशी मागणी होत आहे. अशामध्ये काँग्रेस नेते प्रमोद कृष्णम यांनी मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. प्रियांका गांधींनी काँग्रेसच्या विविध कार्यक्रमांमध्ये तसेच मोर्चांमध्ये आघाडीची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता काँग्रेस हायकमांड आणि विरोधी पक्ष आगामी काळामध्ये काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.