मोदींकडून हिमाचलमधील सरकार पाडण्याचा प्रयत्न काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने त्यांच्या प्रचारसभांमधून हिमाचल प्रदेशमधील सरकार पाडण्याच्या घोषणा करत आहेत.
मोदींकडून हिमाचलमधील सरकार पाडण्याचा प्रयत्न काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दावा

मंडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने त्यांच्या प्रचारसभांमधून हिमाचल प्रदेशमधील सरकार पाडण्याच्या घोषणा करत आहेत. मोदी भ्रष्टाचार आणि पैशाच्या बळावर हिमाचल प्रदेशमधील सरकार पाडण्याचा प्रयत्न करतील, अशी भीती काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी हिमाचलमधील मंडी येथे एका सभेत बोलताना व्यक्त केली. हिमाचल प्रदेशच्या राजकारणात गेल्या महिन्यात मोठा भूकंप झाला होता. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या सहा आमदारांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केले होते. पक्षविरोधात बंडखोरी करणाऱ्या आमदारांची काँग्रेसने हकालपट्टी केली होती. त्यानंतर हिमाचल प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षांनी या सहा आमदारांना अपात्र ठरवले होते. सहा आमदार अपात्र ठरल्यामुळे हे मतदारसंघ आता रिकामे झाले असून, निवडणूक आयोगाने या सहा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपचे वरिष्ठ नेते सातत्याने हिमाचल प्रदेशचे दौरे करत असून, स्वतः पंतप्रधान मोदी यांनी अनेकवेळा हिमाचल प्रदेशचा दौरा केला आहे. यावेळी मोदी यांनी दावा केला होता की, हिमाचल प्रदेशमधील सुखविंदर सिंह सुक्खी यांचे सरकार जास्त दिवस टिकणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या याच वक्तव्याचा उल्लेख करत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दावा केला की, पंतप्रधान मोदी हिमाचल प्रदेशमधील सुक्खू सरकार पाडण्याच्या तयारीत आहेत. यासाठी ते साम, दाम, दंड नीतीचा वापर करण्याची भीती आहे.

logo
marathi.freepressjournal.in