“ते युद्ध थांबवू शकतात, पण पेपरफुटी नाही”, राहुल गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोचक टीका

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेतील गोंधळावरून सरकारला धारेवर धरलं.
“ते युद्ध थांबवू शकतात, पण पेपरफुटी नाही”, राहुल गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोचक टीका
Published on

दिल्ली: काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेतील (NEET EXAM) गोंधळावरून सरकारला धारेवर धरलं. आज दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राहुल गांधी बोलत होते. पेपरफुटीमुळं देशातील विद्यार्थ्य़ांचं भविष्य धोक्यात आल्याचं ते म्हणाले. हिंदुस्थानातील प्रामाणिक लोकांना परीक्षा पार पाडण्याचं काम दिलं, तर पेपरफुटी होणार नाही. परंतु राजकीय संबंधांतून मध्यस्तांच्या माध्यमातून परीक्षा घेतल्या गेल्या, तर असं होणारंच असं राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान मोदी रशिया-युक्रेन युद्ध थांबवू शकतात, पण देशातील पेपरफुटी थांबवू शकत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?

NEET परीक्षेतील गोंधळावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, "हिंदुस्थानमध्ये अनेक प्रामाणिक लोक आहेत. त्यांना काम दिलं, तर पेपर लीक होणार नाहीत. जर राजकीय संबंधातून काम दिलं, तर असंच होणार. देशातील सर्व संस्थांना अशा प्रकारे कंट्रोल केलं गेलं आहे."

NTA संस्थेला HRD मंत्र्यांनी एकप्रकारे क्लीनचीट दिलीये. यावरून सरकारची भूमिका स्पष्ट दिसतीये, मग तुम्ही पुढे कसे जाणार आहात, असं राहुल गांधींना विचारलं असता ते म्हणाले,"त्यांची याबाबतीत विश्वासार्हता नाहीये. त्यांनी क्लीनचीट दिली याला काहीच अर्थ नाही. सर्वांना माहितीये की, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये सर्वात जास्त पेपर लीकच्या तक्रारी समोर आल्या होत्या."

...म्हणून पेपरफुटी प्रकरणे घडत आहेत: राहुल गांधी

नीट परिक्षेमध्ये देशभरात गोंधळ पाहायला मिळाला. त्यामुळं NEET परिक्षा देणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. याचाच संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले, "भाजपकडून शैक्षणिक क्षेत्र ताब्यात घेतल्यामुळंच पेपरफुटीसारखी प्रकरणं घडत आहेत. ही प्रकरणं वाढतच आहेत. भाजपने शैक्षणिक संस्थांवर आपल्या विचारांचे लोक नियुक्त केले. या लोकांकडून पेपरफुटीवर कार्यवाही होण्याची गरज होती, मात्र त्यांनी काहीच केले नाही. असे लोक शैक्षणिक संस्थांवर नेमल्यामुळं विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे."

राहुल गांधी पुढे म्हणाले की, “या प्रकरणी आता चौकशी सुरू आहे. एक परीक्षा रद्द झाली आहे. पुढची परीक्षा होणार की नाही? याची कल्पना नाही. या पेपरफुटीसाठी जे जे लोक जबाबदार आहेत, त्यांना अटक करून कारवाई केली गेली पाहीजे.”

logo
marathi.freepressjournal.in