काँग्रेसला दुबळी करण्याचा प्रयत्न; सोनिया गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप

काँग्रेसची बँक खाती गोठवणे हे गुन्हेगारी कृत्य असून त्याने देशात लोकशाहीचा संकोच झाल्याचे राहुल यांनी म्हटले तर बँक खाती गोठवल्याने निवडणुकीत नि:पक्षपाती वातावरण राहणार नाही, असा दावा खर्गे यांनी केला.
काँग्रेसला दुबळी करण्याचा प्रयत्न; सोनिया गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप
Published on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काँग्रेसला आर्थिकदृष्ट्या दुबळी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न करत आहेत, असा आरोप काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी गुरुवारी केला. सोनिया गांधी यांनी त्यांचे चिरंजीव व काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या बरोबरीने गुरुवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला.

काँग्रेसची बँक खाती गोठवणे हे गुन्हेगारी कृत्य असून त्याने देशात लोकशाहीचा संकोच झाल्याचे राहुल यांनी म्हटले तर बँक खाती गोठवल्याने निवडणुकीत नि:पक्षपाती वातावरण राहणार नाही, असा दावा खर्गे यांनी केला. भारतीय जनता पक्षानेही लगेचच त्याला उत्तर दिले. आणीबाणी लादणाऱ्या आणि आजवर सतत, सर्व पातळ्यांवर देशाची लूट करणाऱ्या काँग्रेसने लोकशाहीची भाषा करणे हास्यास्पद आहे. काँग्रेसची दिवाळखोरी आर्थिक नसून ती नैतिक आणि बौद्धिक स्वरूपाची आहे, असे भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी म्हटले आहे. भाजप खासदार रवीशंकर प्रसाद यांनीही काँग्रेसचे आरोप फेटाळून लावत राहुल जेवढे जास्त बोलतील तेवढी काँग्रेस जास्त अडचणीत येत जाईल, असे वक्तव्य केले.

काँग्रेस सध्या आर्थिक अडचणीतून जात आहे. पक्षावर आयकर चुकवण्याबाबत आरोप आहेत. ते प्रकरण आयकर लवादात सुरू आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने काँग्रेसची बँक खाती गोठवली. त्यामुळे आमच्याकडे खर्चाला धड २ रुपयेही राहिलेले नाहीत. आम्ही आमच्या नेत्यांना कोठेही निवडणूक प्रचाराला पाठवू शकत नाही. त्यांची रेल्वे तिकिटे काढण्याइतके पैसेही आमच्याकडे शिल्लक नाहीत. केंद्राने काँग्रेसची बँक खाती गोठवून गुन्हेगारी कृत्य केले आहे. त्याने देशातील लोकशाही व्यवस्थाच गोठवण्यात आली आहे. आम्ही देशातील २० टक्के मतदारांचे प्रतिनिधित्व करतो. पण आमची निवडणूक लढवण्याची शक्तीच खच्ची केली जात आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले. मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आमची बँक खाती गोठवून निवडणूक लढवण्याची क्षमता संपवण्यात येत असेल तर देशात लोकशाही आहे हे कसे म्हणता येईल? त्याने निवडणुकीत सर्वांना समान संधी मिळणार नाही. भाजपने हा फार धोकादायक खेळ चालवला आहे.

logo
marathi.freepressjournal.in