मोदींविरुद्ध काँग्रेसची हक्कभंग नोटीस

काँग्रेसचे खासदार चरणजितसिंग चन्नी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यासाठी नोटीस सादर केली आहे.
मोदींविरुद्ध काँग्रेसची हक्कभंग नोटीस
Published on

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार चरणजितसिंग चन्नी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यासाठी नोटीस सादर केली आहे. भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी केलेल्या शेरेबाजीतील काही वादग्रस्त वक्तव्य अध्यक्षांनी कामकाजातून काढून टाकले होते. त्याच वक्तव्याचा तपशिल नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट केल्याबद्दल चन्नी यांनी मोदी यांच्याविरुद्ध हक्कभंगाची नोटीस दिली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना ठाकूर यांनी काही वादग्रस्त शेरेबाजी केली होती ती अध्यक्षांनी कामकाजातून काढून टाकली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या जातीबद्दलचे वक्तव्य ठाकूर यांनी केले होते. चन्नी यांनी मोदी यांच्याविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यासाठी अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे नोटीस सादर केली आहे. लोकसभेच्या अध्यक्षांनी जे वादग्रस्त वक्तव्य कामकाजातून काढून टाकले होते, त्या वक्तव्याचा व्हिडीओ मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट केला, त्याबद्दल आपण मोदी यांच्याविरुद्ध हक्कभंग मांडणार असल्याबद्दलची ही नोटीस आहे, असे चन्नी यांनी म्हटले आहे. बिर्ला यांनी कामकाजातून जे वक्तव्य काढून टाकले, त्या वक्तव्यासहित मोदी यांनी तो संपूर्ण व्हिडीओ ‘एक्स’वर पोस्ट केला, ही बाब धक्कादायक आहे, तो हक्कभंग आहे, असे चन्नी यांनी म्हटले आहे.

मोदींचे संसदीय हक्कभंगास प्रोत्साहन - काँग्रेस

ठाकूर यांचा वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ ‘एक्स’वर पोस्ट करून मोदी यांनी संसदीय हक्कांचे उल्लंघन करण्यास प्रोत्साहन दिले आहे आणि ही गंभीर बाब आहे. ठाकूर यांचे वक्तव्य दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीयांचा अपमान करणारे आहे, असा हल्ला विरोधी पक्षांनी बुधवारी चढविला. ठाकूर यांच्या वक्तव्याचा विरोधकांनी जोरदार निषेध केला. त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाल्याने त्याचप्रमाणे जातनिहाय जनगणनेची मागणी विरोधकांनी रेटून धरल्याने लोकसभेचे कामकाज बुधवारी दुपारपर्यंत तहकूब करण्यात आले होते. संसदेच्या इतिहासातील ही लाजिरवाणी घटना आहे, यावरून भाजप, रा. स्व. संघ परिवार आणि मोदी यांचा जातीयवाद अधोरेखित होतो, असे काँग्रेसने म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in