नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याला दांडी मारली, मात्र दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात त्यांनी ध्वजारोहण केले. त्यानंतर बोलताना त्यांनी मोदी सरकारवर टीका करताना देशातील लोकशाही आणि घटना धोक्यात असल्याचे सांगितले.
लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण व नंतर मोदी यांचे भाषण खर्गे यांनी चुकवले. त्याबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, आपण प्रथम घरी आणि नंतर काँग्रेस पक्ष कार्यालयात स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा केला. काँग्रेस मुख्यालयातील कार्यक्रमास राहुल गांधी यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित होते. आपल्या डोळ्यात काहीतरी त्रास होत होता म्हणून आपण लाल किल्ल्यावरील कार्यक्रमास उपस्थित राहू शकलो नाही, असे खर्गे यांनी सांगितले आहे. लाल किल्ल्यावर गेलो असतो तर काँग्रेस कार्यालयात वेळेत पोहोचू शकलो नसतो. वेळेची कमतरता आणि डोळ्यातील त्रास यामुळे आपण लाल किल्ल्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही, असे खर्गे यांनी स्पष्ट केले. काँग्रेस मुख्यालयातील ध्वजारोहण कार्यक्रमास राहुल गांधी, मीरा कुमार, अंबिका सोनी, सलमान खुर्शिद यांसारखे मोठे नेते आणि अन्य सदस्य तसेच पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांना उद्देशून खर्गे आपल्या भाषणादरम्यान म्हणाले की, राष्ट्रउभारणी ही एक अविरत प्रक्रिया असते. आपले स्वातंत्र्यवीर आणि पहिले पंतप्रधान नेहरू यांनी आपल्या योगदानातून देशातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत, पण अलीकडे लोक विकास होतच नाही अशी आवर्इ काढत आहेत, पण ते सत्य नाही. ब्रिटिशांनी देश सोडला तेव्हा या देशात काहीच शिल्लक नव्हते. आपण एक सुर्इची देखील निर्मिती करू शकत नव्हतो, अशा शब्दात त्यांनी टीकाकारांचा समाचार घेतला.