खर्गे यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी

निवडणूक अधिकाऱ्यांकडून विरोधी पक्षांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप रविवारी काँग्रेसने केला
खर्गे यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी

नवी दिल्ली : निवडणूक अधिकाऱ्यांकडून विरोधी पक्षांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप रविवारी काँग्रेसने केला. बिहारच्या समस्तीपूर येथे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली, तर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या नेत्यांना मुक्तपणे संचार करण्याची मुभा देण्यात आली, असे काँग्रेसने म्हटले आहे.

खर्गे यांच्या समस्तीपूर आणि मुझफ्फरपूर येथे पाठोपाठ सभा होत्या. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची केरळमध्ये तपासणी करण्यात आली आणि आता खर्गे यांच्या हेलिकॉप्टरची समस्तीपूर येथे तपासणी करण्यात आली, असा दावा काँग्रेसचे नेते राजेश राठोड यांनी 'एक्स'वर केला आहे.

खर्गे यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली जात असून त्यावर तेथील निवडणूक अधिकारी जातीने लक्ष ठेवून असल्याचा व्हिडीओ संदेश राठोड यांनी 'एक्स'वर जाहीर केला. खर्गे यांच्या हेलिकॉप्टरभोवती पोलीस आणि अधिकारी असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. काँग्रेसच्या नेत्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी नियमितपणे केली जाते, तशी एनडीएच्या नेत्यांच्याही हेलिकॉप्टरची तपासणी केली जाते का, याबाबत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे, असे राठोड यांनी म्हटले आहे.

हेलिकॉप्टर तपासणीबाबत अहवाल जाहीर करावा

हेलिकॉप्टर तपासणीबाबतचा अहवाल निवडणूक आयोगाने जाहीर करावा, अन्यथा केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी त्यांच्याच हेलिकॉप्टरची तपासणी केली जाते असा त्याचा अर्थ लावला जाईल, असेही राठोड म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in