काँग्रेसची देशभर ईडी कार्यालयांबाहेर निदर्शने; सत्ताधाऱ्यांकडून यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप

केंद्र सरकारकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करण्यात येत असून यासाठी केंद्रीय एजन्सींचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत दिल्लीसह देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुधवारी जोरदार निदर्शने केली.
काँग्रेसची देशभर ईडी कार्यालयांबाहेर निदर्शने; सत्ताधाऱ्यांकडून यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप
एक्स @INCIndia
Published on

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करण्यात येत असून यासाठी केंद्रीय एजन्सींचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत दिल्लीसह देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुधवारी जोरदार निदर्शने केली. दिल्लीतील अकबर रोडवरील पक्षाच्या मुख्यालयाबाहेर जमलेल्या अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले.

काँग्रेसच्या ‘नॅशनल हेराल्ड’ वृत्तपत्र आणि ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’शी (एजेएल) संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांच्याविरोधात पहिले आरोपपत्र दाखल केले. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात बुधवारी निदर्शने केली. तपास यंत्रणांचा गैरवापर करत केंद्र सरकार विरोधी पक्षाच्या नेत्यांवर बळजबरीने कारवाई करत आहे, असा आरोप निदर्शकांनी केला.

या प्रकरणाची सुनावणी २५ एप्रिल रोजी दिल्लीतील राऊस अव्हेन्यू कोर्टात होईल. न्यायालयाने ईडीकडून या प्रकरणाची केस डायरीही मागितली आहे. २०१२ मध्ये, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया, राहुल आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांशी संबंधित लोकांविरुद्ध याप्रकरणी तक्रार केली होती. १२ एप्रिल २०२५ रोजी मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. ईडीने दिल्ली, लखनऊ आणि मुंबईतील ६६१ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी नोटीस बजावली होती. काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर झालेल्या या आंदोलनात काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी सहभाग नोंदवला.

काँग्रेसचे नेते आणि राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट म्हणाले की, ‘‘आम्ही हे प्रकरण बऱ्याच काळापासून पाहत आहोत. यात कोणताही व्यवहार झालेला नाही तसेच मालमत्तेचे हस्तांतरण नाही. ही फक्त जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी केली जात असलेली चाल आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे प्रकरण कायदेशीर आणि राजकीयदृष्ट्या लढतील. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. गुजरातमध्ये पक्षाचे पुनरुज्जीवन करत असल्याने भाजपला धोका वाटत आहे. हा ईडीचा स्पष्टपणे गैरवापर आहे.”

काँग्रेस खासदार आणि अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी म्हणाले की, “आरोपपत्र दाखल करण्याची वेळ संशयास्पद होती. तुम्हाला कालक्रम समजून घ्यावा लागेल. राहुल गांधी गुजरातमध्ये आहेत, बिहारच्या निवडणुका येत आहेत, भाजप आसामबद्दल घाबरली आहे आणि अचानक हे आरोपपत्र समोर येते. हा विरोधकांना चिरडण्याचा प्रयत्न आहे. गांधी कुटुंबाचे देशासाठी बलिदान अतुलनीय आहे, हे सत्ताधारी विसरत आहेत.”

भाजपने आरोप फेटाळले

वरिष्ठ भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत ईडीच्या कारवाईचे समर्थन केले आणि काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, “काँग्रेसला निषेध करण्याचा अधिकार आहे, परंतु त्यांना जमीन आणि सार्वजनिक निधी लुटण्याचा अधिकार नाही. हे संपूर्ण प्रकरण निधी आणि मालमत्तेच्या गैरवापराबद्दल आहे. २००८ मध्ये ‘नॅशनल हेराल्ड’ने प्रकाशन थांबवले. त्यानंतर, काँग्रेसने प्रकाशक ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ला (एजेएल) ९० कोटी रुपये दिले. ‘एजेएल’ची मालमत्ता हडप करण्याचा हा कॉर्पोरेट कट होता. दिल्ली, मुंबई, लखनऊ, पाटणा आणि भोपाळमधील मालमत्ता ‘यंग इंडिया’ला हस्तांतरित करण्यात आल्या.

रॉबर्ट वड्रा यांची सलग दुसऱ्या दिवशी ईडीकडून चौकशी

गुरुग्राम जमीन घोटाळा प्रकरणात काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात पोहोचले. प्रियंका गांधी स्वत: त्यांना सोडण्यासाठी आल्या होत्या. याआधी मंगळवारीही ईडीने वाड्रा यांची सुमारे ६ तास चौकशी केली होती. “मी कधीही स्वतःला सॉफ्ट टार्गेट म्हणणार नाही. जर केंद्र सरकारने मला त्रास दिला किंवा माझ्यावर कोणताही दबाव आणला तर मी अधिक मजबूत होऊन अधिक सक्रिय होईन. आम्ही नेहमीच जनतेसाठी लढत राहू,” असे वड्रा म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in