
नवी दिल्ली : भारताचे ‘सीडीएस’ जनरल अनिल चौहान यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या संघर्षात पाकने भारताची विमाने पाडल्याप्रकरणी खुलासा सिंगापूरला का केला? असा सवाल काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे.
‘सीडीएस’ चौहान यांनी सिंगापूरला विमान पाडली गेल्याचा खुलासा केल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. रमेश म्हणाले की, लष्करी व परदेशी धोरणाबाबत सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलावणे गरजेचे आहे. ‘सीडीएस’ जनरल अनिल चौहान यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत महत्त्वाची माहिती सिंगापूरला असताना का दिली? तसेच पंतप्रधान व संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत पहिल्यांदा ही माहिती देणे गरजेचे होते, असे रमेश म्हणाले.
कारगिल युद्धानंतर भारताच्या संरक्षण तयारीबाबत विशेष पुनर्आढावा समिती तीन दिवसांत स्थापन केली गेली होती. आताही अशाच प्रकारची समिती स्थापन केली पाहिजे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे वडील त्या समितीचे अध्यक्ष होते. हा अहवाल संसदेत मांडून त्यावर व्यापक चर्चा झाली होती.