
आज लोकसभेत प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी (Goutam Adani) यांच्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळाले. काँग्रेस (Congress) खासदार राहुल गां धी यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अडाणी यांच्यावर गंभीर आरोप केले. राहुल गांधींनी (Rahul Gandhi) नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचे फोटो दाखवत त्यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, "२०१४ मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी ६०९व्या क्रमांकावर होते. पण ते दुसऱ्या स्थानावर आले. ही जादू नेमकी झाली कशी? लोकांनी विचारले की हे यश कसे मिळाले? आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अदाणींचे काय नाते आहे?" असा सवाल उपस्थित केला.
राहुल गांधींनी बोलताना नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचे फोटो सभागृहात झळकावले. मात्र, यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आक्षेप घेत यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, "पोस्टरबाजी बंद करा, नाहीतर सत्ताधारी पक्षाचे लोक राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि अदानी यांचे एकत्र फोटो दाखवतील." असे म्हणत झापले. यानंतर राहुल गांधी म्हणाले की, "अनेक वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. मोदींच्या खांद्याला खांदा लावून उभा असलेला एक माणूस पंतप्रधानांशी एकनिष्ठ होता. २०१४मध्ये जेव्हा पंतप्रधान मोदी दिल्लीत पोहोचले तेव्हा खरी जादू सुरू झाली." असे गंभीर आरोप केले आहेत.
पुढे राहुल गांधी म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी बांग्लादेशला गेले, तिथला मोठा पॉवर प्रोजेक्ट गौतम अदानींना मिळाला. त्यानंतर पंतप्रधान मोदी श्रीलंकेला गेले, तिथल्या सरकारवर दबाव टाकून एक मोठा विंड प्रोजेक्ट अदानींना मिळवून दिला. सरकारी कंपनी असलेल्या एलआयसीचा पैसाही अदानींच्या कंपनीत लावून मोठी मदत केली. अदानी देशाच्या अर्थ क्षेत्रात, संरक्षण क्षेत्रात हस्तक्षेप करतात. शेल कंपन्यांच्या माध्यमातून पैसे भारतात गुंतवले जात आहेत. या कंपन्या कोणाच्या नावावर आहेत? हे तपासण्याचे काम सरकारचे आहे." अशी टीका त्यांनी केली.