
आज काँग्रेस (Congress) आमदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी रायपूरमध्ये सुरु असलेल्या काँग्रेस महाअधिवेशनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, (Narendra Modi) भाजप, (BJP) आणि त्यांचे गौतम अदानी (Goutam Adani) यांच्यासोबत असलेल्या संबंधांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, "अदानीबाबत संसदेत प्रश्न विचारला जाऊ शकत नाही. मात्र, आम्ही हजारवेळा प्रश्न विचारणार. जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही." असा इशारा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला आहे.
यावेळी राहुल गांधींनी गौतम अदानींची तुलना ही ईस्ट इंडिया कंपनीशी केली. ते म्हणाले की, "स्वातंत्र्यांची लढाई ही ईस्ट इंडिया कंपनीविरोधात होती. त्यांनी पण देशाची संपत्ती लुटण्याचे काम केले. आताही इतिहासाची पुनरावृत्ती होत असून देशाच्या विरोधात काम होत असल्याने काँग्रेस त्यांच्याविरोधात लढत राहील. कमकुवत असणाऱ्यांना मारणे, ही कोणती देशभक्ती?" असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे.
"अदानींच्या शेल कंपन्यांची चौकशी का होत नाही? देशाच्या संरक्षणाच्या मुद्दा आहे. अदानी आणि मोदी एक आहेत. अदांनीवरून संसदेत प्रश्न विचारला जाऊ शकत नाही. मात्र, आम्ही एकदा नाही तर हजारवेळा यावर प्रश्न विचारणार आहोत. सत्य बाहेर येईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, जर देशविरोधी कामे होत असतील, तर काँग्रेस त्यांच्याविरोधात उभा राहणार आहे." अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.