मुंबई : काँग्रेसचा गड म्हणून ओळखले जाणारे अमेठी आणि रायबरेली या दोन लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांची आज (३ मे) घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तर, अमेठी मतदारसंघातून काँग्रेसचे नेते के. एल. शर्मा यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती काँग्रेसने एक्सवरून (आधीचे ट्विटर) दिली.
उत्तर प्रदेशतील रायबरेली आणि अमेठी या लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. राहुल गांधी आज दुपारच्या सुमारास उमेदवारी अर्ज भरतील. यावेळी ते शक्तिप्रदर्शनही करतील. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात रायबरेली आणि अमेठी या दोन जागांवर २० मे रोजी मतदान होणार आहे.
रायबरेली आणि गांधी कुटुंबाचे अतूट नाते
रायबरेली मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व कायम राहिले आहे. या मतदारसंघातून १९६७ मध्ये पहिल्यांदा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती आणि विजयी झाल्या होत्या. नंतर १९७१च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि विजयी देखील झाल्या. मात्र, १९७७ च्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांचा जनता पक्षाचे राज नारायण यांनी पराभव केला होता. यानंतर १९८० च्या निवडणुकीत पुन्हा इंदिरा गांधींना विजय मिळाला होता. २०१९ मध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि त्यांना देखील विजय मिळाला होता. परंतु, २०२४ मध्ये सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आणि राज्यसभेवर जाण्याचे ठरविले. त्यामुळे रायबरेलीची जागा रिक्त झाली होती.
अमेठीतून प्रियांकांच्या नावाला पूर्णविराम
गेल्या काही दिवसांपासून प्रियांका गांधी या अमेठीमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, आज अमेठी येथून के. एल. शर्मा यांना पक्षाने उमेदवारी दिल्यामुळे प्रियांका गांधींच्या निवडणूक लढण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
निवडणुकीत काँग्रेस अमेठीचा गड राखणार का?
२०१९ मध्ये अमेठीतून राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपच्या स्मृती इराणी उभ्या होत्या. या निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधीचा पराभव केला होता. आता पुन्हा स्मृती इराणी अमेठीमधून निवडणूक लढवत आहेत. यावेळी के. एल. शर्मा विरूद्ध स्मृती इराणी अशी लढत होणार आहे. त्यामुळे काँग्रेसला अमेठी गड राखण्यात यश मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.