काँग्रेसच्या खासदाराला बलात्कारप्रकरणी अटक

काँग्रेसचे खासदार राकेश राठोड यांना गुरुवारी उत्तर प्रदेशातील सीतापूर येथे त्यांच्या घरातच पत्रकार परिषद सुरू असताना बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
काँग्रेसच्या खासदाराला बलात्कारप्रकरणी अटक
Published on

सीतापूर : काँग्रेसचे खासदार राकेश राठोड यांना गुरुवारी उत्तर प्रदेशातील सीतापूर येथे त्यांच्या घरातच पत्रकार परिषद सुरू असताना बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. पीडित महिलेने त्याबाबत तक्रार केली होती.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने या प्रकरणातील अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राठोड यांना अटक करण्यात आली आहे. राकेश राठोड यांनी लग्नाचे वचन देऊन चार वर्षे एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

पीडितेने राकेश राठोड यांच्याविरोधात १७ जानेवारी रोजी शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. तसेच, याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने राकेश राठोड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. न्या. राजेश चौहान यांनी राकेश राठोड यांना दोन आठवड्यांत आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते.

याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी कोतवालीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, पीडितेने कॉल रेकॉर्डिंगही पोलिसांना दिले आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक पुरावेही गोळा केले आहेत. याशिवाय, पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिचा जबाबही न्यायालयासमोर नोंदवण्यात आला आहे.

आत्मसमर्पणापूर्वीच घरात शिरून अटक

राकेश राठोड हे आत्मसमर्पण करणार होते. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, खासदार राकेश राठोड गेल्या ४ वर्षांपासून लग्नाच्या बहाण्याने आणि राजकीय कारकीर्दीत मदत देण्याचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण करत होते. तसेच, त्यांच्याकडून तिला सतत धमक्या दिल्या जात होत्या.

logo
marathi.freepressjournal.in