यूपीत काँग्रेस, सपा वेगळ्या वाटेवर! लोकसभेच्या जागावाटपावर अद्याप एकमत नाही

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी ११ जागांच्या प्रस्तावावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सपाने नव्याने जागा निवडून काँग्रेस नेतृत्वाला यादी पाठवली.
यूपीत काँग्रेस, सपा वेगळ्या वाटेवर! लोकसभेच्या जागावाटपावर अद्याप एकमत नाही

नोएडा : इंडिया आघाडीला आणखी एक मोठा धक्‍का बसण्‍याची शक्‍यता आहे. उत्तर प्रदेशमध्‍ये काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमध्‍ये जागावाटपावरून सध्या जोरदार बिनसल्‍याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत दोन्‍ही पक्षांमध्‍ये जागावाटपावर एकमत झालेले नाही. अशा स्थितीत सपा लोकसभा निवडणूकीत ‘एकलो चलो रे’च्या भूमिकेत येऊ शकते. सपाने काँग्रेसला लोकसभेच्या १७ जागा ऑफर केल्या होत्या. तर काँग्रेस २० जागांसाठी आग्रही आहे.

सोमवारी, समाजवादी पक्षाने आता आघाडीअंतर्गत १७ जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचा प्रस्ताव काँग्रेसला दिला होता. यापूर्वी, सपाने काँग्रेसला ११ जागांवर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला होता, त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू होती. सोमवारी सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी काँग्रेससाठी लोकसभेच्या १७ जागा सोडण्याचा निर्णय घेतला.

समाजवादी पार्टीने अमेठी, रायबरेली, बाराबंकी, सीतापूर, कैसरगंज, वाराणसी, अमरोहा, सहारनपूर, गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, बुलंदशहर, फतेहपूर सिक्री, कानपूर, हाथरस, झाशी, महाराजगंज आणि बागपत या जागा काँग्रेसला दिल्या होत्या. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सपाकडून १७ जागांचा प्रस्ताव आला आहे, मात्र यावर पक्षाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. याआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी ११ जागांच्या प्रस्तावावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सपाने नव्याने जागा निवडून काँग्रेस नेतृत्वाला यादी पाठवली.

सपाच्या दुसऱ्या यादीत ११ उमेदवार

लोकसभा निवडणुकीसाठी सपाने सोमवारी आपली दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये मुझफ्फरनगरमधून हरेंद्र मलिक, आमलामधून नीरज मौर्य, शाहजहांपूरमधून राजेश कश्यप, हरदोईमधून उषा वर्मा, मिश्रीखमधून रामपाल राजवंशी आदींची उमेदवारी जाहीर झाली आहे.

स्वामी प्रसाद मौर्य यांचा राजीनामा

समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा राजीनामा दिल्यानंतर आठवडाभरानंतर स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंगळवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि उत्तर प्रदेश विधान परिषदेचा राजीनामा दिला. तसेच त्यांनी नवा पक्ष स्थापन करणार असल्याचे घोषित केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in