राहुल गांधींना हीरो बनवण्याची कॉँग्रेसची रणनीती

राहुल विरुद्ध मोदी असा याला रंग देण्याची कॉँग्रेसची योजना आहे
राहुल गांधींना हीरो बनवण्याची कॉँग्रेसची रणनीती

नवी दिल्ली : मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भाषणाने चर्चेला सुरुवात होईल, असे अपेक्षित होते. परंतु दुपारी १२ वाजता राहुल यांच्याऐवजी अचानक गौरव गोगोई बोलायला उभे राहिले. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेच्या एक दिवस अगोदर राहुल गांधी यांना खासदारकी बहाल झाली होती. त्यामुळे त्यांना संसदेत मोदी सरकारवर उट्टे काढायची संधी असताना राहुल यांनी माघार का घेतली, असा प्रश्न सर्वांना पडला. मात्र कॉँग्रेसने रणनीतीनुसार राहुल गांधी यांच्या भाषणाची वेळ बदलत १० ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतील त्याच दिवशी निश्चित केली आहे. राहुल विरुद्ध मोदी असा याला रंग देण्याची कॉँग्रेसची योजना आहे. राहुल गांधी हेच इंडिया आघाडीचे प्रमुख नेते आहेत, हा संदेशही देण्यासाठी कॉँग्रेसने ही खेळी खेळली आहे. याशिवाय चर्चेच्या पहिल्याच दिवशी राहुल यांनी भाषण केले असते तर त्यांचे मुद्दे मागे पडले असते. १० ऑगस्टला मोदी यांचे भाषण असल्यामुळे मीडियामध्ये त्यांचीच चर्चा रंगली असती. कॉँग्रेसला ते होऊ द्यायचे नाही, हेच या निमित्ताने अधोरेखित होत आहे.

राहुल गांधींच्या प्रतिमेबाबत काँग्रेस पक्ष आतापर्यंत बचावात्मक भूमिका घेत होता. भारत जोडो यात्रेपासून चित्र बदलले आहे. ट्विटरवर येणारे व्हिडीओ, त्यांच्या भेटी, बैठका पाहता २०२४ ची ही तयारी असल्याचे स्पष्ट होत आहे. इंडिया आघाडी झाल्यापासून काँग्रेस उत्साही आहे. पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची औपचारिक घोषणा झाली नसली, तरी काँग्रेस नेत्यांनी २०२४ साठी राहुल गांधींबद्दल बोलायला सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर राहुल गांधींपुढे 'जननायक' ही उपाधी लिहिण्यास सुरुवात केली आहे. लोकसभेचे सदस्यत्व बहाल करण्याची अधिसूचना येण्यापूर्वीच काँग्रेसने राहुल गांधींना फिल्मीस्टाइलमध्ये लोकसभेत ग्रँड एण्ट्री घडवून आणली. राहुल गांधी हे विरोधी पक्षातील सर्वात मोठे स्टार बनल्याचेही मीडियात बोलले जात आहे. अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेच्या निमित्ताने कॉँग्रेस याचा लाभ उठवण्याची तयारी करत आहे.

logo
marathi.freepressjournal.in