हिमाचल प्रदेशमधील सरकार वाचविण्यासाठी काँग्रेसची धावाधाव

हिमाचल प्रदेशात मंगळवारी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी झाल्यानंतर राज्यात उद्भवलेल्या राजकीय अस्थिरतेतून आपले सरकार वाचविण्यासाठी काँग्रेस पक्षाचा आटापिटा सुरू झाला आहे.
हिमाचल प्रदेशमधील सरकार वाचविण्यासाठी काँग्रेसची धावाधाव
Published on

सिमला/नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशात मंगळवारी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी झाल्यानंतर राज्यात उद्भवलेल्या राजकीय अस्थिरतेतून आपले सरकार वाचविण्यासाठी काँग्रेस पक्षाचा आटापिटा सुरू झाला आहे. पक्षाने तातडीने तीन निरीक्षक सिमला येथे धाडले असून कोणतेही कठोर पाऊल उचलण्यास पक्ष कचरणार नाही, असेही काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुखू यांनी राजीनामा दिल्याची अफवाही पसरली होती. त्यातच राज्य मंत्रिमंडळातील एका वजनदार मंत्र्यांने पदाचा राजीनामा दिल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, भाजपच्या १५ आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी निलंबित केले आहे.

मंगळवारी राज्यातील राज्यसभेच्या केवळ एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत सत्तारूढ काँग्रसेच्या सहा आमदारांनी बंड केले. त्यामुळे भाजपचा उमेदवार विजयी झाला तेव्हापासून राज्यातील राजकीय उलथापालथींना वेग आला आहे.

दरम्यान, आपले सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करील, पक्षश्रेष्ठी अथवा अन्य कोणीही आपल्याला राजीनामा देण्यास सांगितलेले नाही. राज्यात ज्या पद्धतीने भाजपने काम केले ते पाहता त्यांचा त्यांच्याच लोकांवर विश्वास नाही असे दिसते, सीआरपीएफ तैनात करण्यात आले, हेलिकॉप्टरचाही वापर करण्यात आला, असे    सुखविंदरसिंह सुखू म्हणाले.

विधानसभेच्या अध्यक्षांनी विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांच्यासह १५ आमदारांना निलंबित केले. तरीही अर्थसंकल्प आवाजी मतदानाने मंजूर होऊ नये यासाठी ठाकूर बराच वेळ सभागृहातच थांबले होते. अर्थसंकल्पावर मतदान घेण्याची भाजपची इच्छा होती, कारण त्यामुळे सरकार अल्पमतात गेल्याचे स्पष्ट होईल, असे भाजपला वाटत होते.

तथापि, दुपारी वित्त विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले त्यावेळी भाजपचा एकही आमदार सभागृहात हजर नव्हता. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष कुलदीपसिंह पठाणिया यांनी सभागृहाचे कामकाज स्थगित केले.

सभागृहात अद्याप अर्थसंकल्प प्रलंबित असून भाजप अविश्वास ठराव मांडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांनी बुधवारी सकाळी राज्यपालांची एका शिष्टमंडळासह भेट घेतली आणि वित्त विधेयकावर मतदान घेण्याचा आग्रह धरला.

काँग्रेसच्या सहा आमदारांनी मंगळवारी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराला मतदान केले. सुखविंदरसिंह सुखू यांच्या कार्यपद्धतीबद्दल ते नाराज होते, असा दावा सूत्रांनी केला. राज्यसभेच्या निवडणुकीमुळे काँग्रेसचे सरकार अल्पमतात गेल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे सुखू यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे.

'जय श्रीराम, बन गया काम'

दरम्यान, काँग्रेसचे सहा आणि तीन अपक्ष आमदार यांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्यानंतर त्यांना मंगळवारी रात्री भाजपशासित हरयाणातील एका अतिथीगृहात नेण्यात आले, बुधवारी त्यांचे सभागृहात आगमन होताच भाजपच्या आमदारांनी त्यांचे 'जय श्रीराम, बन गया काम', अशा घोषणा देत स्वागत केले.

हिमाचल प्रदेशातील पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भूपेश बाघेल, भूपिंदरसिंग हुडा आणि डी. के. शिवकुमार या पक्षाच्या तीन निरीक्षकांना तातडीने सिमला येथे पाठविले आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.

भाजप 'ऑपरेशन लोटस'द्वारे जनाधार हिरावून घेऊ शकत नाही, जनाधार अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेस आवश्यक ती स्रर्व पावले उचलेल, विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत राज्यातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना नाकारले होते, असेही रमेश म्हणाले.

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी तीनही निरीक्षकांशी आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे राज्य प्रभारी राजीव शुक्ला यांच्याशी चर्चा केली आहे, त्यांना सर्व आमदारांशी चर्चा करण्यास सांगण्यात आले आहे, नाराज आमदारांशी चर्चा करून सर्वसमावेशक अहवाल सादर करण्यास त्यांना सांगितले आहे, त्यानंतर पुढील कृती केली जाईल, असे रमेश म्हणाले.

विक्रमादित्य सिंह यांचा राजीनामा

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री विक्रमादित्य सिंह यांनी पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री आणि राज्यपालांकडे राजीनामा दिल्याचे ते म्हणाले. पक्षात आपल्याला अपमानित करण्याचे अनेकदा प्रयत्न झाले, तरीही आपण सरकारला पाठिंबा दिला होता, असेही ते म्हणाले.

पक्षातील घडामोडींबाबत आपण अध्यक्ष खरगे आणि प्रियांका गांधी-वढेरा व राहुल गांधी यांना माहिती दिल्याचेही ते म्हणाले. आपल्या समर्थकांशी चर्चा केल्यानंतर पुढील दिशा ठरविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

जनाधार चिरडण्याची भाजपची इच्छा- प्रियांका

केंद्रीय तपास यंत्रणा आणि पैशांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर करून भाजपला हिमाचल प्रदेशातील जनाधार चिरडून टाकावयाचा आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा यांनी बुधवारी येथे केला. लोकशाहीत सर्वसामान्य जनतेला आपल्या पसंतीचे सरकार निवडून देण्याचा अधिकार आहे, जनतेने त्या अधिकाराचा योग्य वापर करून काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत दिले असताना केंद्रीय यंत्रणा आणि पैशांचा गैरवापर करण्यात आला असल्याचे सांगतानाच, असे प्रकार देशाच्या इतिहासात कधीही घडले नव्हते, याकडेही प्रियांका यांनी लक्ष वेधले.

-काँग्रेसने सिमला येथे तीन निरीक्षक धाडले

-मंत्री विक्रमादित्य यांचा राजीनामा

-बंडखोर आमदारांचे 'जय श्रीराम,

-बन गया काम' घोषणेने स्वागत

-भाजपचे १५ आमदार निलंबित

-मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही अफवा

logo
marathi.freepressjournal.in