नवी दिल्ली : आगामी २०२४ सालच्या लोकसभेसाठी काँग्रेस पक्ष दिल्लीतील सर्व सातही जागा स्वत: लढणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय बुधवारी नवी दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या बैठकीत अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी जाहीर केला. या बैठकीस राहुल गांधी देखील उपस्थित होते. चार तास चाललेल्या या बैठकीस एकूण ४० नेते उपस्थित होते आणि त्यांनी आपली मते मांडली.
लोकसभा निवडणुकीसाठी आता उणेपुरे सात महिने उरले आहेत. तेव्हा प्रत्येकाने तयारीला लागा, अशा आम्हाला सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी या बैठकीनंतर दिली. ही बैठक सुमारे चार तास सुरु होती. या बैठकित झालेल्या चर्चेत दिल्लीतील काँग्रेस पक्ष कसा मजबूत होर्इल, यावरच प्रामुख्याने चर्चा झाली.
काँग्रेसची ही घोषणा अरविंद केजरीवाल यांना नक्कीच रुचणार नाही. कारण ते देखील इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहेत. त्यांच्या पक्षासाठी काँग्रेस एकही जागा देणार नसेल तर आघाडीत बिघाडी होण्याची भीती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यामुळे काँग्रेसच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देतांना आप नेते आणि दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले की, याबाबत आमचे केंद्रीय नेतेच निर्णय घेतील. आमची राजकीय व्यवहार समिती आणि इंडिया आघाडीतील पक्ष एकत्र बसून निवडणुकीतील युतीबाबत निर्णय घेतील.’’