काँग्रेसचा 'आरक्षणविरोधी चेहरा' उघड - अमित शहा, राहुल गांधींना देशविरोधी वक्तव्य करण्याची सवय!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कोटा टिप्पणीमुळे काँग्रेसचा "आरक्षणविरोधी चेहरा" पुन्हा एकदा समोर आला असून "देशविरोधी वक्तव्ये" करणे ही विरोधकांची आता सवयच झाली आहे, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी टीका केली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रपीटीआय
Published on

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कोटा टिप्पणीमुळे काँग्रेसचा "आरक्षणविरोधी चेहरा" पुन्हा एकदा समोर आला असून "देशविरोधी वक्तव्ये" करणे ही विरोधकांची आता सवयच झाली आहे, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी टीका केली आहे.

सत्तेत जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत कोणीही आरक्षण रद्द करू शकत नाही. तसेच देशाच्या सुरक्षेला हानी पोहोचू शकत नाही, असेही शहा म्हणाले. राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे प्रादेशिकता, धर्म आणि भाषिक भेदांच्या धर्तीवर तेढ निर्माण करण्याच्या काँग्रेसच्या राजकारणाला तोंड फुटले आहे. देशातील आरक्षण रद्द करण्याबाबत बोलून राहुल गांधींनी काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा पुन्हा एकदा समोर आणला आहे, असे शहा यांनी सांगितले.

शहा म्हणाले की, देशात फूट पाडण्याचा कट रचणाऱ्या शक्तींला समर्थन देणे आणि देशविरोधी वक्तव्ये करणे ही राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाची सवयच आहे. जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या राष्ट्रविरोधी आणि आरक्षणविरोधी आराखड्याला समर्थन देणाऱ्या तसेच परदेशात भारतविरोधी विधाने करणाऱ्या राहुल गांधींनी देशाच्या सुरक्षेबाबत नेहमीचधोकादायक वक्तव्य करत देशवासीयांच्या भावना दुखावल्या आहेत. जे विचार त्यांच्या मनात होते तेच आता शब्दांच्या रुपात बाहेर पडल्याचे गृहमंत्री म्हणाले. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी शीख समुदायाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर चोहोबाजुंनी टीकेचा भडिमार होत आहे. अमेरिकेतील विद्यार्थ्यांच्या काऱ्यक्रमात `भारतातील शीखांसाठी सध्याचा धोका' या विषयावर राहुल गांधी यांनी भाषण दिले होते. त्यानंतर भारतासह जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे.

वॉशिंग्टनच्या व्हर्जिनिया उपनगरातील हेरंडन येथे सोमवारी शेकडो भारतीय अमेरिकनांला संबोधित करताना, राहुल गांधी यांनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा काही धर्म, भाषा आणि समुदायांना इतरांपेक्षा कनिष्ठ मानतो, असेही वक्तव्य राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात केले.

शीख समुदायाची माफीची मागणी

शीख धर्मियांबद्दल वक्तव्य करणा-या राहुल तसेच सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील जनपथ रोडवरील घरासमोर शीख नेत्यांनी आंदोलन करत माफीची मागणी केली. यावेळी शीखांच्या एका समुदायाने निदर्शनेही केली. भाजपच्या काऱ्यकर्त्यांनी निषेध मोर्चा काढत गांधी यांनी तातडीने माफी मागावी, अशा घोषणा दिल्या. आंदोलनादरम्यान भाजप नेते व प्रवक्ते आर. पी. सिंग आणि इतर शीख नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. सिंह यांनी सांगितेल की, राहुल गांधींनी भारताची बदनामी करण्यासाठी परदेशी भूमीचा वापर केला आणि शीखांना पगडी घालण्याची आणि गुरुद्वारात जाण्याची परवानगी नाही, असे निखालस खोटे विधान शिखांबद्दल केले. सिंह हे भाजपच्या दिल्लीतील शीख समाजशाखेचे नेतेही आहेत.

शीख फुटीरतावाद्याचे राहुलना समर्थन

शीख फुटीरतावादी नेता गुरपतवंत सिंग पन्नू यांनी मात्र राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. पन्नू यांनी राहुल यांच्या वक्तव्याचे समर्थन करताना राहुल यांना धाडसी म्हणून संबोधिले आहे. शीखांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे, याबाबतच्या इतिहासावर राहुल हे ठाम असल्याचेच त्यांच्या विधानातून दिसून येते, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in