बंगळुरू : कर्नाटकातील काँग्रेस सरकार पाडण्याचे मोठे कारस्थान शिजत आहे, पण हा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असा निर्धार कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी व्यक्त केला आहे. कोणाचेही नाव त्यांनी घेतले नसले तरी त्यांचा रोख मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या दिशेने असल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी गृहमंत्री जी. परमेश्वर आणि राज्य सरकारमधील इतर मंत्र्यांसोबत डिनर पार्टी आयोजित केली होती. मात्र, या पार्टीला शिवकुमार नव्हते. सिद्धरामय्या यांनी शिवकुमार यांना बाजूला केल्याचे बोलले जात आहे. शिवकुमार यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले की, काही मोठे चेहरे काँग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी मोठे षड्यंत्र रचले जात आहे. शिवकुमार यांना पाठिंबा देणारे नेते आणि आमदार या बैठकीला उपस्थित होते.