राज्यघटनेच्या जनजागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी! उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रतिपादन

भारतीय राज्यघटनेबाबत नवीन पिढीत जनजागृती निर्माण करण्यासाठी संविधान मंदिर नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.
राज्यघटनेच्या जनजागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी! उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रतिपादन
@VPIndia/X
Published on

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असून भारतीय राज्यघटना ही सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय राज्यघटनेबाबत नवीन पिढीत जनजागृती निर्माण करण्यासाठी संविधान मंदिर नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.

एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे कौशल्य विकास विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत महाराष्ट्रातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिर’ लोकार्पण सोहळा रविवारी पार पडला. यावेळी उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर येथून दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

भारतीय संस्कृतीचे सार आपल्या संविधानात सामावले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीमध्ये खूप मोठे योगदान आहे. भारतीय राज्यघटना सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण असून राज्यघटनेचा गाभा आपण समजून घेणे गरजेचे आहे. वंचितांच्या विकासासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर परिश्रम केले. सामाजिक न्याय हा आरक्षणाचा आधार असून वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यावर भर देणे गरजेचे आहे. डॉ. आंबेडकर यांचे योगदान नव्या पिढीला समजणे गरजेचे असून त्यादृष्टीने संविधान मंदिर उपक्रम अतिशय उपयुक्त ठरेल, असे धनखड म्हणाले.

जागतिक लोकशाही दिवस सर्वत्र साजरा होत असताना आपल्याला अभिमान आहे की भारत हा सर्वात मोठा लोकशाही असलेला देश असून जो विविधतेतही एकता जपून आहे. याचे सर्व श्रेय आपल्या संविधानाला जाते. भारतीय हीच आपली पहिली ओळख असून राज्यघटनेप्रती आपण सदैव आदर बाळगणे गरजेचे आहे. या संविधानाचे महत्त्व नव्या पिढीला समजावे यासाठी असे उपक्रम खूप गरजेचे आहेत. राज्यात ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिर’ लोकार्पण हा उपक्रम स्तुत्य असल्याचे धनखड म्हणाले.

राहुल गांधींची संविधानविरोधी मानसिकता उघड!

राहुल गांधी यांनी अलीकडेच संविधानाबद्दल केलेल्या वक्तव्याचा समाचारही यावेळी उपराष्ट्रपती धनखड यांनी घेतला. घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने विदेशात आरक्षण संपुष्टात आणायला हवे, असे वक्तव्य करून आपली संविधानविरोधी मानसिकता दाखवून दिली, अशी टीका धनखड यांनी केली.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १०९४ ते १९०७ या काळात जेथे शिक्षण झाले, त्याठिकाणी आपण उभे आहोत याचा मला अभिमान वाटतो. एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल ही पहिली शाळा आहे, ज्या शाळेने देशातील आजच्या कौशल्य विकास विभागाचा पाया घातला. राज्यात सुरू असलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, रोजगार मेळाव्याचे आयोजन, यांसारख्या अनेक नाविन्यपूर्ण योजना कौशल्य विकास विभागाने सुरू केल्या आहेत, ज्यामुळे बेरोजगारी कमी होण्यास मदत होत आहे.

राज्याच्या विकासामध्ये कौशल्य विकास विभागाचे मोठे योगदान आहे. राज्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिरा’चे लोकार्पण होत आहे याचा मला अभिमान आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

जागतिक लोकशाही दिनाचे औचित्य कौशल्य विकास विभागांतर्गत ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिर’ लोकार्पण होत आहे याचा अत्यंत आनंद आहे. आपले संविधान आणि त्याचे महत्त्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संविधान मंदिराच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचतील, असे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले.

यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांच्या डॉ. भदंत राहुल बोधी (महाथेरो), भदंत बोधिशील स्थंविर, राजकुमार त्रिमुखे, बाळू अहिरे, हनुमंत लोंढे यांचा सत्कार करण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in