राज्यघटना आमच्यासाठी गीता, कुराण आणि बायबल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्पष्टोक्ती

राज्यघटना आमच्यासाठी गीता, रामायण, महाभारत, कुराण, आणि बायबल आहे. घटना आमच्यासाठी सर्वस्व आहे,...
राज्यघटना आमच्यासाठी गीता, कुराण आणि बायबल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्पष्टोक्ती

जयपूर : राज्यघटना आमच्यासाठी गीता, रामायण, महाभारत, कुराण, आणि बायबल आहे. घटना आमच्यासाठी सर्वस्व आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले. घटनेचा विनाश करण्यासाठी भाजप सरसावला असल्याच्या विरोधकांच्या आरोपांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी चांगलाच समाचार घेत विरोधकांवर जोरदार हल्ला चढविला. देशाची घटना आमच्यासाठी वंदनीय आहे आणि आता स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकरही घटना रद्द करू शकणार नाहीत, असे मोदी म्हणाले.

राजस्थानच्या बारमेर येथे निवडणूक सभेत मोदी बोलत होते. काँग्रेस पक्ष देशविरोधी घटकांसमवेत उभा असून इंडिया आघाडी देश दुर्बल करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप मोदी यांनी केला. केंद्रीय राज्यमंत्री कैलास चौधरी यांच्या समर्थनार्थ निवडणूक सभा आयोजित करण्यात आली होती.

काँग्रेसने अनेक दशके अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीयांबाबत दुजाभाव केला, डॉ. आंबेडकर यांना निवडणुकीत पराभूत केले, त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कारही दिला नाही, देशात आणीबाणी लादून घटना रद्द करण्याचा प्रयत्न केला आणि आता हाच काँग्रेस पक्ष मोदींवर टीका करण्यासाठी घटनेचा आधार घेत आहे, घटनेच्या नावाखाली इंडिया आघाडी खोटे बोलतआहे, असे मोदी म्हणाले.

राम मंदिर निवडणूक मुद्दा नाही

अयोध्येतील राम मंदिर हा भाजपचा निवडणूक जुमला असल्याच्या इंडिया आघाडीच्या टीकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी जोरदार हल्ला चढविला. हा निवडणूक जुमला नाही तर देशातील जनतेच्या विश्वासाची गोष्ट आहे, असे मोदी म्हणाले. राम मंदिर हा कधीच निवडणूक प्रश्न नव्हता आणि तो कधीही नसेल, असेही पंतप्रधान म्हणाले.

काँग्रेस आणि त्यांच्या घटक पक्षांची तुलना मोदी यांनी मुघलांसमवेत केली. मंदिरांची तोडफोड करण्यात त्यांना आनंद मिळत होता, श्रावण महिन्यात मांसाहार करण्यात येत असल्याचे व्हिडीओ व्हायरल करून बहुसंख्य समाजाला डिवचून व्होटबँक पक्की करावयाची, अशी त्यांची मानसिकता असल्याचा आरोपही मोदी यांनी केला.

जम्मू-काश्मीरला लवकरच राज्याचा दर्जा

उधमपूर : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करून दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केल्यानंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होण्याची आणि जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळण्याची वेळ आता दूर नाही, केंद्रशासित प्रदेशातील जनता आता आपले प्रश्न लवकरच मंत्री आणि आमदार यांच्यासमोर मांडू शकतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in