आएनएस विक्रांतपेक्षाही मोठ्या युद्धनौकेची बांधणी सुरु

लांबी व वजन पाहता ही युद्धनौका भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका असेल.
आएनएस विक्रांतपेक्षाही मोठ्या युद्धनौकेची बांधणी सुरु

विमानवाहू आयएनएस विक्रांत दोन दिवसांपूर्वीच भारतीय नौदलात सामील झाली असताना सागरी सुरक्षेचे आव्हान लक्षात घेता आएनएस विक्रांतपेक्षाही मोठ्या आणखी एक युद्धनौकेची बांधणी भारतीय नौदलाने सुरू केली आहे. ‘आयएनएस विशाल’ची बांधणी सुरू झाली आहे. नौदलाच्या कोचीन शिपयार्डमध्ये ‘आयएनएस विशाल’ची बांधणी सुरू आहे. ही युद्धनौका २०३०पर्यंत भारतीय नौदलात सामील होईल, अशी आशा आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आयएनएस विशाल’चे वजन ६५ हजार टन असू शकते. याची लांबी २८४ मीटर लांब असेल. म्हणजेच लांबी व वजन पाहता ही युद्धनौका भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका असेल. सध्या भारतीय नौदलाकडे कार्यरत असलेल्या आयएनएस विक्रमादित्य व ‘आयएनएस विक्रांत’चे वजन ४५ हजार टनाच्या आसपास आहे. ‘आयएनएस विशाल’ वर ५५ लढाऊ विमाने तैनात होऊ शकतात. ‘आयएनएस विक्रमादित्य’वर ३५ तर ‘आयएनएस विक्रांत’वर ३० लढाऊ विमाने तैनात असतील. ‘आयएनएस विक्रांत’ची लांबी २६२ मीटर तर ‘आयएनएस विक्रमादित्य’ची लांबी २८४ मीटर आहे.

भारताला आपल्या सागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज विमानवाहू युद्धनौकेची गरज आहे. गेल्या काही वर्षांपासून हिंदी महासागरात चीनने आपली संरक्षण क्षमता वाढवण्यास घेतली आहे. त्यांच्या युद्धनौका, पाणबुड्या हिंदी महासागरातून संचार करत आहेत. चीनकडे ‘लिओनिंग’ व ‘शेडोंग’ या दोन विमानवाहू युद्धनौका आहेत. नुकत्याच त्यांनी तिसरी विमानवाहू युद्धनौका ‘फुजियान’चे जलावतरण केले. तसेच हिंद-प्रशांत क्षेत्र हा जगातील सर्वाधिक व्यापारी सागरी मार्ग आहे. त्यामुळे या विभागाच्या संरक्षणात भारताची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे भारताकडे ‘आयएनएस विशाल’ युद्धनौका असणे गरजेचे आहे.

५५ हजार कोटी लागणार

‘आयएनएस विक्रांत’च्या बांधणीला २० हजार कोटी रुपये खर्च आला होता. पहिल्या दोन युद्धनौकांपेक्षा ‘आयएनएस विशाल’ ही अजस्त्र युद्धनौका असणार आहे. या युद्धनौकेसाठी ५५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या युद्धनौकेवर २३०० जण राहू शकतील.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in