नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने बुधवारी माझगाव डॉकयार्ड शिपबिल्डर्स लिमिटेडसोबत भारतीय तटरक्षक दलासाठी सहा अद्ययावत गस्ती नौकांच्या (ऑफशोअर पेट्रोल व्हेसल्स) खरेदीसाठी १,६१४ कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली. या नौका अधिग्रहणाचा उद्देश सागरी सुरक्षेसाठी तटरक्षक दलाची क्षमता वाढवणे आहे, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
संरक्षण मंत्रालयाने भारतीय तटरक्षक दलासाठी सहा गस्ती जहाजांच्या खरेदीसाठी २० डिसेंबर रोजी माझगाव डॉकयार्ड शिपबिल्डर्स लिमिटेड सोबत करार केला, असे मंत्रालयाने सांगितले. खरेदी केल्या जाणाऱ्या सहा जहाजांपैकी चार सध्याच्या जुन्या ऑफशोअर गस्ती जहाजांची जागा घेतील आणि इतर दोन तटरक्षक दलाच्या ताफ्यात वाढ करतील.
ही आधुनिक आणि उच्च-तंत्रज्ञानयुक्त जहाजे समुद्रात गस्त घालणे, कायद्याची अंमलबजावणी,शोध आणि बचाव, सागरी प्रदूषण रोखणे आणि मानवतावादी सहाय्यासह इतर महत्त्वपूर्ण क्षमता वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. अनेक प्रगत उपकरणांसह ही ऑफशोर गस्ती जहाजे बहुउद्देशीय ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षमता आणि वायरलेस नियंत्रित रिमोट वॉटर रेस्क्यू क्राफ्ट लाइफबॉयने सुसज्ज असतील.